आम्ही काँग्रेसचे सरकार असतानाही काम केले असून १९५३ मध्ये जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना आमच्या कंपनीने भारताशी पहिल्यांदा करार केला होता. आम्ही भारत सरकारसोबत काम करतो. आम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही, अशा शब्दात ‘डासू’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एरिक त्रपिएर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. रिलायन्स या कंपनीची निवडही आम्हीच केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन २ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनिल अंबानी यांना लक्ष्य केले होते. ‘डासू’ या कंपनीने अनिल अंबानींच्या कंपनीला २८४ कोटी रुपये दिले. यातूनच अनिल अंबानी यांनी नागपूरमध्ये जमीन विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ‘डासू’ या कंपनीचे सीईओ एरिक त्रपिएर यांनी मंगळवारी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.

राहुल गांधी यांच्या आरोपांवर एरिक म्हणाले, आम्ही भारतात काँग्रेसचे सरकार असतानाही करार केले असून विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे मी दुखावलोय. भारतासोबत आमचा पहिला करार १९५३ मध्ये झाला होता. जवाहरलाल नेहरू त्यावेळी पंतप्रधान होते. आम्ही कोणत्याही पक्षासोबत काम करत नाही. आम्ही भारतासाठी काम केले. भारताच्या हवाई दलाला आम्ही शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला, असा दावा त्यांनी केला.  मी खोटं बोलत नाही. मी कंपनीचा सीईओ असल्याने माझ्या प्रतिष्ठेत ते बसत नाही, मी राफेल संदर्भातील माहिती यापूर्वीही दिली असून मी त्यावर ठाम आहे, असे त्यांनी सांगितले.

आम्ही रिलायन्समध्ये गुंतवणूक केली नव्हती. आम्ही जे पैसे दिले ते रिलायन्स – डासू यांची संयुक्त भागीदारी असलेल्या कंपनीत जाणार होते, असेही त्यांनी सांगितले. संयुक्त भागीदारीत दोन्ही कंपन्या ५०- ५० टक्के गुंतवणूक करणार आहेत. आम्ही सुरुवातीला ४० कोटी रुपये दिले असून आगामी पाच वर्षात या कंपनीत आमच्याकडून ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्सची निवड का केली यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. सुरुवातीला आम्ही भारतातील टाटा आणि अन्य कंपन्यांसोबत चर्चा केली. मात्र, त्यावेळी टाटाची अन्य विमान कंपन्यांसोबतही चर्चा सुरु होती. शेवटी आम्ही रिलायन्ससोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. विमानांची किंमत वाढवण्यात आली नसून रिलायन्सची निवडही आम्हीच केली, असे त्यांनी सांगितले.