रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुलाचं म्हणजेच आकाश अंबानीचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. नुकतच आकाशच्या प्री एंगेजमेंट पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये कुटुंबियांसह बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींचीही उपस्थिती पाहायला मिळाली. नव्या सुनेच्या येण्यानं अंबानी कुटुंबातही आनंदाला उधाण आलं आहे.
सोशल मीडियावर सध्या याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओमध्ये अंबानी कुटुंबिय गुजराती रितीरिवाजांनुसार त्यांच्या घरात येणाऱ्या नव्या सदस्याचं स्वागत करताना दिसत आहेत. मुकेश अंबानी यांची मुलगी इशा या व्हिडिओमध्ये आपल्या वहिनीचं स्वागत करताना दिसत आहे.
भावाची होणारी पत्नी म्हणजे अनेक नणंदांच्या आवडीची. मुळात नणंद- भावजय हे नातच अगदी आपुलकीचं, जिव्हाळ्याचं. नात्यांमधील हीच आपुलकी आणि जिव्हाळा इशा आणि श्लोकाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. जेथे इशाने आपल्या वहिनीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आणि लगेचच आपल्या भावाची खोड काढली.
सध्या सोशल मीडियावर आकाश आणि श्लोकाच्या ‘लव्ह स्टोरी’चीही चर्चा आहे. काही वेबसाइट्स आणि माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर श्लोकाने प्रिंस्टन युनिव्हर्सिटीतून अँथ्रोपोलॉजीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायंसची निवड केली. २०१४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोकाने ‘रोसी ब्ल्यू फाऊंडेशन’मध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 10:26 am