रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या रद्द झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी आणखी एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र नोटा बदलण्यासाठीची ही मुदत अतिशय कमी कालावधीसाठी आणि अत्यल्प रकमेच्या नोटांसाठी असणार आहे. या मुदतीमुळे देशभरातील बँकांमध्ये जुन्या नोटा बदलण्याची संधी मिळणार आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे. सरकारी अधिकारी आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे.

३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बदलू न शकलेल्या लोकांची संख्या मोठी आहे आणि या लोकांकडून जुन्या नोटा कशा बदलायच्या, याबद्दल वारंवार विचारणा सुरू आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ‘दोन हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या जुन्या नोटा असल्यास लोकांना त्या बदलून घेता येतील. मात्र या नोटा आतापर्यंत बदलणे का शक्य झाले नाही, यामागील कारण लोकांना सांगावे लागेल,’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जुन्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक देशभरातील बँकांमध्ये एक खिडकी सुरू करण्याच्या विचारात आहे. मात्र या खिडकीतून मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत. या खिडक्यांचा गैरवापर होऊ नये, यासाठी ही दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींच्या ८ नोव्हेंबरच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. निश्चलीकरणाच्या निर्णयाची घोषणा करताना मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँकांमधून बदलून घेण्यासाठी ३० डिसेंबरची मुदत दिली होती. तर रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांमधून ३१ मार्चपर्यंत समर्पक कारण देऊन जुन्या नोटा बदलता येणार आहे.