रेमडेसीवीर व टोसिलिझुमाब या औषधांचा वापर करोनावरील उपचारासाठी करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी त्याच्या चांगल्या परिणामांपेक्षा वाईट परिणाम अधिक आहेत. परिणामी त्यांचा वापर काळजीपूर्वक केला जावा, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषद व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांनी दिला आहे. या औषधांची मात्रा योग्य प्रमाणात देणेच आवश्यक आहे. त्याच्या जास्त वापराने आरोग्यास धोका निर्माण होतो असे सांगण्यात आले.

कोविड रुग्णांच्या उपचार व्यवस्थापनात या औषधांना तातडीच्या रुग्णांवर उपचारासाठी मान्यता देण्यात आली असली तरी त्यांचा वापर करताना काळजी घेण्याची गरज आहे. जे गंभीर रुग्ण आहेत त्यांच्यात रेमडेसीवीरचा वापर केल्याने लवकर सुधारणा दिसून येते हे खरे असले तरी त्याचा उपयोग मृत्युदर कमी करण्यात होत नाही असे तज्ञांचे मत आहे. रेमडेसीवीरचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे असून त्याचे यकृत व मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतात.

टोसिलीझुमाब या औषधाचा अभ्यास करण्यात आला असून त्यामुळे करोनाचा मृत्युदर कमी होत नाही फक्त रुग्णातील सुधारणा लवकर होऊ शकते. या औषधांचा वापर करताना रुग्णांची परवानगी घेणे गरजेचे असून ही औषधे सायटोकीन स्टॉर्म म्हणजे प्रतिकारशक्ती प्रणालीची अतिरिक्त प्रतिक्रिया रोखत असतात. या औषधांचा वापर चांगली सुविधा असलेल्या संस्थांतच अपेक्षित असून आयसीएमआरने म्हटल्यानुसार ऑक्सिजन उपचार, स्टेरॉइड या पद्धतींचा वापर, मानसिक समुपदेशन यांचा समावेश व्यवस्थापनात गरजेचा आहे. रेमडेसीवीर व टोसिलीझुमॅब या औषधांना भारताच्या औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली असून  आपत्कालीन परिस्थितीत त्याचा वापर अपेक्षित आहे. किरकोळ लक्षणे असलेल्यांसाठी हायड्रॉक्सि क्लोरोक्विनची शिफारस केली आहे.