नोटाबंदीनंतर पाचशे आणि दोन हजार रुपयाची नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकारने २०० रुपयाची नोट छापण्याची तयारी सुरु केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०० रुपयाच्या नोटच्या छपाईला सुरुवातदेखील केली असून आगामी काही महिन्यांमध्ये या नोटा चलनात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘इकॉनॉमिक टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक व्यवहार आणखी सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी आरबीआयने २०० रुपयाची नोट छापण्याचे आदेश दिले असून यानंतर सरकारी मुद्रणालयात नोट छापण्याच्या कामाला सुरुवातदेखील झाली आहे. जुलैपर्यंत या नोटा चलनात आणण्याचे सरकारचे उद्दीष्ट होते. पण आता या नोटा चलनात आणण्यासाठी आणखी वेळ लागेल असे सूत्रांनी सांगितले.

आरबीआयने या वृत्तावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अर्थतज्ज्ञांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. २०० रुपयाच्या नोटेमुळे दैनंदिन व्यवहार आणखी सुलभ होतील असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. नोटाबंदीनंतर दोन हजारपेक्षा ५०० रुपयाच्या नोटेमुळे चलनतुटवड्यातून दिलासा दिला होता. आता दोनशे रुपयाची नोट आल्यानंतर मोठा दिलासा मिळेल असे जाणकारांनी सांगितले.
गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत पाचशे आणि एक हजार रुपयाची नोट चलनातून बाद केली होती. यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयाची नोट चलनात आली होती. दोनशे रुपयाच्या नोटेमध्येही सुरक्षेवर भर देण्यात आला असून बनावट नोटा छापता येणार नाही याची दक्षथा घेण्यात आली आहे असे सूत्रांनी सांगितले.