केंद्रीय विद्यापीठांचे परीक्षण (ऑडिट) करणाऱ्या सरकारी समितीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या नावात बदल सुचवला आहे. या दोन्ही विद्यापीठांची निधर्मीवादी प्रतिमा जपण्यासाठी त्यांच्या नावातून अनुक्रमे ‘मुस्लिम’ व ‘हिंदू’ शब्द वगळावेत, असे या समितीने म्हटले आहे.

विद्यापीठ अनुदान समितीकडून (युजीसी) २५ एप्रिलला दहा केंद्रीय विद्यापीठांविरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पाच समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय मनुष्यबळ खात्याकडून यासंदर्भातील आदेश देण्यात आले होते. यापैकी एका समितीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या नावात बदल करावे, असे अहवालात नमूद केले आहे. या समितीने बनारस हिंदू विद्यापीठाचे परीक्षण केले नव्हते. तरीही विद्यापीठाच्या नावात बदल करावा, असे समितीचे म्हणणे आहे.

 

विद्यार्थिनींनी हक्क मागितला, मिळाल्या लाठ्या; बीएचयू प्रकरणी राहुल गांधींची टीका

दरम्यान, या समितीकडून अन्य केंद्रीय विद्यापीठांचे परीक्षणही करण्यात आले होते. यामध्ये पुद्दुचेरी विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ, उत्तराखंडमधील हेमवंती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ, झारखंडमधील सेंट्रल विद्यापीठ, राजस्थान सेंट्रल विद्यापीठ, जम्मू सेंट्रल विद्यापीठ, वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, त्रिपुरा विद्यापीठ आणि मध्य प्रदेशातील हरीसिंह गौर विद्यापीठाचा समावेश आहे. समितीने या विद्यापीठांतील शैक्षणिक, संशोधन, आर्थिक आणि अन्य सुविधांचे परीक्षण केले होते. मात्र, तरीही समितीने परीक्षणाच्या आपल्या कक्षा रुंदावत अलिगढ विद्यापीठाच्या नावातील मुस्लिम शब्द वगळण्याची सूचना केली. या विद्यापीठाचे केवळ अलिगढ विद्यापीठ किंवा सर सय्यद अहमद खान ठेवावे, असे समितीने म्हटले. तर बनारस हिंदू विद्यापीठाच्याबाबतही समितीने असाच अभिप्राय नोंदवला आहे.

‘बीएचयू’ साठी नव्या कुलगुरूंचा शोध, गिरीश चंद्र त्रिपाठींची गच्छंती अटळ