उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने अलाहाबादचे ‘प्रयागराज’ आणि फैजाबादचे ‘अयोध्या’ असे नामकरण केल्यानंतर आता आग्रा शहराचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. भाजपचे आमदार जगनप्रसाद गर्ग यांनी आग्रा शहराचे नाव ‘अग्रवन’ असे करावे अशी सरकारला विनंती केली आहे.

जगनप्रसाद गर्ग यांनी ही मागणी करणारे पत्रच आदित्यानाथ यांना लिहिले आहे. आग्रा येथे एकेकाळी मोठय़ा प्रमाणावर जंगल होते, हे वनांचे शहर होते, त्याचप्रमाणे महाराज अग्रसेन यांना मानणारा अग्रवाल समाज येथे मोठय़ा संख्येने होता. पूर्वी हे शहर अग्रवन म्हणूनच ओळखले जात होते, परंतु कालांतराने त्याचे नाव अकबराबाद आणि त्यानंतर आग्रा असे झाले. मात्र या नावाला काहीही अर्थ नाही त्यामुळे ते नाव बदलावे, असे गर्ग यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. आग्रा शहराच्या नामांतराच्या मागणीसाठी आपण लवकरच आदित्यनाथ यांना भेटणार असल्याचे गर्ग म्हणाले.