लठ्ठपणा हा विकसनशील व विकसित अशा दोन्ही देशांत दिसून येतो, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रणासह अनेक उपाय केले जातात. काही जण त्यावर औषधे घेतात, तर काही व्यायामाला महत्त्व देतात. प्रत्यक्षात लठ्ठपणाला कारणीभूत असलेला जनूक संशोधकांनी शोधून काढला आहे. लठ्ठपणामुळे वजनही वाढते या समस्येवर उपाय म्हणून हा जनूक निष्प्रभ केला, तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.
या जनुकाचे नाव ‘१४-३-३ झेटा’ असे असून तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत आढळून येतो. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी हा जनूक व त्याचा लठ्ठपणाशी असलेला संबंध दाखवून दिला आहे. त्याबाबतचे उंदरांवर प्रयोग करण्यात आले. ज्या उंदरांमध्ये या जनुकाला निष्क्रिय करण्यात आहे, त्या उंदरांच्या वजनात ५० टक्के घट झाल्याचे दिसून आले. पांढरी चरबी शरीराला घातक असते, त्याचे प्रमाण कमी झाल्याचा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
पांढरी चरबी ही लठ्ठपणाशी संबंधित असते त्यामुळे हृदयरोग व मधुमेहसुद्धा होऊ शकतो. मेद कमी करण्यासाठी या उंदरांचा आहार कमी केला नव्हता, तरीही या उंदरांमधील लठ्ठपणा कमी झाला, त्यांच्यात १४-३-३ झेटा जनुकाची क्रियाशीलता जास्त होती, त्यांच्यात जास्त उष्मांकाचा आहार असताना २२ टक्के जास्त पांढरी चरबी होती. या वर्षी सुरुवातीला वैज्ञानिकांच्या समूहाने मानवी जनुकीय संचयातील १०० असे भाग शोधले आहेत, ज्यांचा लठ्ठपणा वाढण्याशी संबंध आहे. जनुकांचा संबंध भुकेची संवेदना निर्माण होण्याशी व शरीरात चरबी वेगवेगळ्या ठिकाणी कशी विखुरली जाते याच्याशी आहे. असे असले तरी १४-३-३ झेटा या जनुकाच्या संकेतावलीची ओळख पटलेली नाही. हा जनुक अ‍ॅडिपोजेनेसिस या प्रक्रियेत मेद पेशी तयार करीत असतो, त्यामुळेच या पेशींची वाढ होते. जनुके व चरबीची निर्मिती यांचा थेट संबंध या संशोधनातून प्रस्थापित झाल्याने आता लठ्ठपणावर नवीन औषधे तयार करणे सोपे होणार आहे असे संशोधकांचे मत आहे.
चार वर्षांपूर्वी या जनुकावर लिम व जेम्स जॉनसन यांनी संशोधन सुरू केले व त्यात लठ्ठपणाला हे जनुक कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

हा जनूक निष्क्रिय केला तर चरबी साठणे कमी होऊन लठ्ठपणा व जास्त वजनाची समस्या कमी होऊ शकेल. मेदपेशी वाढल्याने एकेक मेदपेशी विस्तारत गेल्याने चरबी वाढत जाते. – गॅरेथ लीम, जैवविज्ञान विभाग, ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ.