धर्माधतेचा मुद्दा क्षीण झाल्याने जातीऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी पुढे रेटण्याची योजना काँग्रेसने आखली आहे. जातीऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण असावे, असे ठोस मत व्यक्त करून काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पुन्हा ‘मंडल-कमंडल’ संघर्षांचे संकेत आज, मंगळवारी बोलताना दिले. जातीवर आधारित आरक्षणामुळे सामाजिक न्यायाऐवजी जातीयवाद वाढल्याचे द्विवेदी म्हणाले. अर्थात हे आपले वैयक्तिक मत असल्याची सारवासारव त्यांनी केली. परंतु पक्षाच्या जाहीरनाम्यात या मुद्दय़ाचा समावेश करावा, अशी मागणी द्विवेदी यांनी केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर द्विवेदींच्या भूमिकेमुळे खळबळ माजली आहे. पक्षाचा निवडणूक जाहीरनामा तयार होत असून त्यात याही विषयाचा समावेश करण्यासाठी मत नोंदविल्याचे द्विवेदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, जातीवर आधारित आरक्षण संपविले पाहिजे. आरक्षण प्रक्रियेत अनेकांचे ‘हित’ दडलेले असल्याने हा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. खरोखरच दलित व मागासवर्गीयांमधील गरजूंना आरक्षणाचा लाभ मिळाला का? आरक्षित जातींमध्ये जे वरच्या स्तरात आहेत त्यांनाच लाभ मिळाला. त्यांच्यातही मोठा वर्ग आरक्षणाच्या लाभापासून अद्यापही वंचित आहे. सामाजिक न्यायाची जागा आता जातीयवादाने घेतली आहे. पक्षाचा निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात या विषयावर आवर्जून विचार करावा, अशी विनंती द्विवेदी यांनी राहुल गांधी यांना केली. पक्षनेतृत्वावर स्तुतिसुमने उधळताना द्विवेदी म्हणाले की, राहुल काँग्रेसचे भविष्य आहेत. जो कुणी जात व धर्माच्या भिंती पाडेल त्याचेच नेतृत्व भविष्यात प्रस्थापित होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2014 1:27 am