चीनमध्ये संसर्गाची दुसरी लाट सुरू होण्याची भीती असतानाच आता वुहानमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.

लक्षणे न दाखवणाऱ्या पण करोनाचा संसर्ग असलेल्या लोकांची संख्या वाढत असून नऊ आठवडय़ांची टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ती केवळ नावालाच शिथिल राहील असा याचा अर्थ आहे. कारण लोकांनी अनावश्यक कारणास्तव बाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे. लक्षणे न दाखवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून त्यांच्यामुळे पुन्हा संसर्ग समूह तयार होऊ शकतात.  २५ मार्चला वुहानला जोखीममुक्त जाहीर करण्यात आले होते. उच्च जोखीम वरून  वुहानला आता मध्यम जोखीम असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सध्या चीनमध्ये १०७५ लक्षणे न दाखवणारे रुग्ण असून स्थानिक संसर्गाचा एकही रुग्ण वुहान व हुबेईत सापडलेला नाही.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, लक्षणे नसलेले ५१ रुग्ण असून ७४२ जणांना  देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने वुहान मधील रहिवाशांना घरातच राहण्यास सांगितले असून लोकांनी त्यांची तापाची तपासणी करत रहावी व मास्क घालावेत असे आवाहन केले आहे. २३ जानेवारीपासून वुहान शहर सीलबंद करण्यात आले होते.  ८ एप्रिलला बाहेरील प्रवास निर्बंध उठवण्यात येणार आहेत.