देशाचा महागाई दर हा जून महिन्यात १.५४ टक्के नोंदवण्यात आला. बुधवारी मिळालेल्या या आकडेवारीनुसार हा देशातल्या महागाईचा हा सर्वात कमी दर आहे. मे महिन्यात हा दर २.१८ टक्के इतका नोंदवण्यात आला होता. जून महिन्यात हाच दर १.५४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. खाद्य पदार्थ आणि भाज्यांचे दर घसरल्यानं मे महिन्यात महागाई दर कमी झाला होता.

एप्रिल महिन्यात हा दर २.९९ टक्के नोंदवण्यात आला होता. २०१२ पासून महागाई दरांसंदर्भातली आर्थिक सूची केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येते. आज ही सूची जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये हा दर १.५४ टक्के नोंदवण्यात आला आहे. सीपीआयनं दिलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. डाळी, नाशिवंत पदार्थ आणि धान्य यांच्या किंमतींमध्ये घट झाल्यानं महागाईचे दर पडले आहेत. त्याचमुळे महागाईचा दर इतका खाली आला आहे.

महागाईचा टक्का घटल्यामुळे केंद्र सरकारला सलग दुसऱ्या महिन्यात काही अंशी दिलासा मिळाला आहे. भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू झाल्यानंर महागाईत २ टक्के घट होईल असा दावा देशाचे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी जून महिन्यातच केला होता. तो आता काही प्रमाणात प्रत्यक्षात उतरताना दिसतो आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी किरकोळ बाजारात खाद्यजन्य पदार्थांच्या किंमती १.५ टक्क्यांनी पडल्या. त्याचा परिणाम महागाई दर कमी होण्यात झाला आहे.

भाज्या आणि डाळींचे दर मोठ्या प्रमाणावर घटले, तर फळांच्या दरात काही प्रमाणात तेजी बघायला मिळाली. याचसोबत कपडे, घरे, इंधन आणि वीजेचे दरही काही प्रमाणात खाली आले ज्यामुळे महागाई दर कमी झाला असेही सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक सूचीमध्ये म्हटले आहे. जून ते सप्टेंबर २०१७ या काळात भारतात जर ७० टक्के पाऊस झाला तर महागाई आणखी नियंत्रणात येईल.

डाळींचे दर १९.४५ टक्क्यांनी कमी झाले, तर भाज्यांचे दर १३ टक्क्यांनी पडले. हा दावा आणि जीएसटी नवी कररचना लक्षात घेतली तर येत्या काळात महागाईचा दर आणखी कमी झालेला बघायला मिळू शकतो. असं असलं तरीही सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट आवाक्यात आणण्यात सरकार यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.