किरकोळ बाजारात भाज्या आणि डाळींच्या किंमती पडल्याने, मे महिन्यात देशाचा महागाईदर २.१८ टक्क्यांवर आला आहे. एप्रिलमध्ये महागाई दर २.९९ टक्के होता. मात्र खाद्यजन्य पदार्थांच्या किंमतींमध्ये सातत्याने घट बघायला मिळाली. २०१२ नंतरचा हा सगळ्यात कमी महागाई दर आहे असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. २०१२ पासून महागाई दरांसंदर्भातली आर्थिक सूची केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येते. आज ही सूची जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये मे महिन्यात महागाई दर २.१८ टक्क्यांवर आल्याचे सरकारने नमूद केले आहे. हा देशातला मागील पाच वर्षातला सर्वात कमी महागाई दर असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी किरकोळ बाजारात खाद्यजन्य पदार्थांच्या किंमती १.५ टक्क्यांनी पडल्या. त्याचा परिणाम महागाई दर कमी होण्यात झाला आहे. भाज्या आणि डाळींचे दर मोठ्या प्रमाणावर घटले, तर फळांच्या दरात काही प्रमाणात तेजी बघायला मिळाली. याचसोबत कपडे, घरे, इंधन आणि वीजेचे दरही काही प्रमाणात खाली आले ज्यामुळे महागाई दर कमी झाला असेही सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक सूचीमध्ये म्हटले आहे. जून ते सप्टेंबर २०१७ या काळात भारतात जर ७० टक्के पाऊस झाला तर महागाई आणखी नियंत्रणात येईल. डाळींचे दर १९.४५ टक्क्यांनी कमी झाले, तर भाज्यांचे दर १३ टक्क्यांनी पडले. या सगळ्याचा परिणाम व्याजदरांवरही होऊ शकतो. ऑगस्टमध्ये होणाऱ्या द्वैमासिक धोरणात यासंदर्भात आरबीआय निर्णय करू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादनांचा दर ३.१ टक्के झाला. जो मार्च महिन्यात २.७ टक्के होता. देशाच्या विकास दराचा विचार करता मार्च महिन्यात ६.१ टक्के वाढ बघायला मिळाली होती. ही वाढ गेल्या तीन वर्षातली सर्वात कमी वाढ आहे. कारण ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ या महिन्यात हा दर ७ टक्के होता. विकासदर कमी झाल्याने सरकारवर टीकेची झोड उठली होती. आता देशपातळीवर महागाई दर कमी झाल्याने मात्र मोदी सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे.