News Flash

Online Scam : माजी सरन्यायाधीशांनाच एक लाखाचा गंडा

माजी सरन्यायाधीश आर एम लोढा ऑनलाइन स्कॅमचे बळी पडले आहेत

तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही बोगस फोन कॉल किंवा ई-मेलला बळी पडून आपली आर्थिक फसवणूक करुन घेऊ नका असं आवाहन वारंवार पोलीस करत असतात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या घटनेत माजी सरन्यायाधीश आर एम लोढा ऑनलाइन स्कॅमचे बळी पडल्याचं समोर आलं आहे. लोढा यांना एक लाखांचा गंडा घालण्यात आला असून त्यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोढा यांच्या मित्राचं ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. दिल्लीमधील पंचशील पार्क येथे वास्तव्यास असणारे माजी सरन्यायाधीश लोढा तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस सहाय्यक आयुक्तांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल कार्यालयात पोहोचले असता ही घटना उघडकीस आली. मालविया नगर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे.

लोढा यांनी तक्रारीत आपण ई-मेलच्या माध्यमातून सतत आपले मित्र आणि सहकारी न्यायाधीस बी पी सिंह यांच्या संपर्कात होतो अशी माहिती दिली आहे. ‘१९ एप्रिल रोजी मला बी पी सिंह यांच्याकडून एक मेल आला. मेलमध्ये आपल्या चुलत भावाच्या उपचारासाठी एक लाखांची तात्काळ गरज असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर मी तात्काळ ऑनलाइन व्यवहार करत १ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले’, असं लोढा यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

न्यायाधीश बी पी सिंह यांची ई-मेल सेवा पुर्ववत झाल्यानंतर ३० मे रोजी त्यांनी आपल्या संपर्क यादीत असणाऱ्या सर्वांना मेल पाठवत ई-मेल आयडी हॅक झाला होता अशी माहिती दिली. जेव्हा लोढा यांनी बी पी सिंह यांनी पाठवलेला मेल वाचला तेव्हा त्यांना आपली १ लाखांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

बी पी सिंह यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर लोढा यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. दरम्यान पोलीस सध्य तपास करत असून हॅकरचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 11:53 am

Web Title: retired judge rm lodha cheated online scam 1 lakh rupees
Next Stories
1 अमरनाथ यात्रेसाठी एक लाख भाविकांनी केली नोंदणी
2 ‘जेट’च्या 2 हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेणार ‘ही’ कंपनी
3 भाजपा आमदाराची दादागिरी, महिलेला मारल्या लाथा
Just Now!
X