भगवान जगन्नाथाची परतीची रथयात्रा मंगळवारी साधेपणाने पार पडली असून करोना साथीमुळे लोकांचा सहभाग अत्यल्प होता. केवळ महत्त्वाचे धार्मिक सोपस्कार यात पार पाडण्यात आले.

मुख्य रथयात्रा नऊ दिवसांची असते. मंगळवारचे कार्यक्रम इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन) येथे झाले. नडिया जिल्ह्यातील मायापूर येथे हे कार्यक्रम पार पडले. हुगळी जिल्ह्यातही रथयात्रांचे परतीचे प्रवास झाले. इस्कॉनचे प्रवक्ते सुब्रता दास यांनी सांगितले, की आम्ही रथयात्रेचा एकच मार्ग निवडला होता व तो तुलनेने कमी अंतराचा होता. केवळ पन्नास भक्तगण या रथयात्रेत सहभागी झाले होते. लोक व इतर भक्तगणांना हा कार्यक्रम केवळ ऑनलाइन पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता.

इस्कॉन कोलकाता येथे गुडुची मंदिरातून मूर्ती नेण्यात आल्या. एका मोठ्या ट्रेलरवर मूर्ती ठेवल्या होत्या. भक्तगणांना यात्रा खुली ठेवण्यात आली नव्हती, असे राधारमण दास यांनी सांगितले. बाकीचे भक्तगण मागून मोटारीने रथयात्रेत सहभागी होते. रस्त्याने फक्त रथयात्रेबरोबर पोलीस चालत होते. गुरूसादे रस्ता व अल्बर्ट रस्ता येथे काही धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. रथयात्रेची ही परंपरा जुनी असून मूर्ती तात्पुरत्या मंदिरातून मुख्य मंदिराकडे नेल्या जातात.