काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयात हा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून शनिवारी यावर सुनावणी होणार आहे.

रॉबर्ट वड्रा यांचे जवळचे सहकारी मनोज अरोरा यांना आर्थिक अफरातफर प्रकरणात दिल्ली कोर्टाने ११ जानेवारीला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. पतियाळा कोर्टाने अरोरा यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर होण्याचे आदेश दिले होते. पाच जानेवारीला ईडीने अरोरा विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावण्यासाठी पतियाळा हाऊस कोर्टात धाव घेतली होती.

वारंवार समन्स बजावूनही अरोरा हजर रहात नाही ईडीचे म्हणणे होते. वड्रा यांच्या परदेशातील अघोषित संपत्तीसाठी अरोराने निधीची व्यवस्था केली असा ईडीचा दावा आहे. रॉबर्ट वड्रा प्रियंका गांधी यांचे पती असून नुकतीच प्रियंका यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.