मोदी सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचे भारतीय किसान संघाने म्हटले आहे. भारतीय किसान संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटना आहे. भारतीय किसान संघाने थेट मोदी सरकारवर टीका केली असल्याने सरकारसाठी हा घरचा आहेर ठरला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार कमी पडत असल्याचे भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर केळकर यांनी म्हटले आहे.

‘शेतकऱ्यांना नाईलाजास्तव शेतमाल कमी किमतीला विकावा लागतो आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत आहे,’ असे म्हणत भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर केळकर यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. ‘नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकरी पूर्णपणे रोख रकमेवर अवलंबून असतात. अचानक पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. भाकड जनावरांच्या आठवडा बाजारातील विक्रीवर निर्बंध आणण्याच्या पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयामुळेदेखील शेतकऱ्यांचे नुकसान झाले,’ असेदेखील प्रभाकर केळकर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. भाकड जनावरांची विक्री करता न आल्यास ती जनावरे शेतकऱ्यांसाठी ओझे ठरतात, असेदेखील केळकर यांनी म्हटले.

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यादरम्यानच्या गोळीबारात झालेला पाच शेतकऱ्यांचा मृत्यू यावरदेखील प्रभाकर केळकर यांनी भाष्य केले. ‘मागील तीन वर्षांपासून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काहीही करण्यात आलेले नाही. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने उत्पादन कमी झाले होते. या वर्षी उत्पादन चांगले झाले. मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळाला नाही. शेतकरी दिवस-रात्र शेतात मेहनत करुन धान्य पिकवतो. मात्र त्याला त्याच्या कष्टाचा परतावा मिळत नाही,’ असेदेखील प्रभाकर केळकर यांनी म्हटले.

‘सरकार शेतकऱ्यांना एक पैसाही जास्त देत नाही. मात्र आता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायची वेळ आली आहे. सरकारने शेतकऱ्यांची मदत करायला हवी. विकासाच्या नावावर सरकारकडून अनेक निर्बंध लादले जात आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या समस्यांमध्ये भर पडत आहे,’ असे केळकर यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये शेतकऱ्यांनी हमीभावासाठी आंदोलन केल्यानंतर आता देशातील इतर राज्यांमध्येही शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे.