केरळचे मुख्यमंत्री पिनरायी यांच्याविरोधात प्रक्षोभक विधाने करणाऱ्या डॉ. कुंदन चंद्रावत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून निलंबित करण्यात आले आहे. डॉ. कुंदन चंद्रावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर प्रचारप्रमुख पदावर कार्यरत होते. ‘केरळच्या मुख्यमंत्र्यांचे शिर कापून आणणाऱ्या व्यक्तीला एक कोटी रुपये देईन,’ असे वक्तव्य चंद्रावत यांनी गुरुवारी केले होते. चंद्रावत यांच्या चिथावणीखोर विधानावरुन देशभरातून टीका झाली होती. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चंद्रावत यांच्यावर आज (शुक्रवारी) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांचे शिर कापून आणणाऱ्याला एक कोटींचे इनाम देईन, असे वादग्रस्त विधान डॉ. कुंदन चंद्रावत यांनी केले होते. केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवरील हल्ल्यांचा निषेध करताना डॉ. कुंदन चंद्रावत यांची जीभ घसरली होती. यावेळी बोलताना चंद्रावत यांनी गुजरात दंगलीचा संदर्भदेखील दिला होता. ‘२००२ मधील गुजरात दंगल विसरलात का?,’ असा सवालदेखील चंद्रावत यांनी सभेत बोलताना उपस्थित केला होता.

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या होत असलेल्या हत्यांचा निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला खासदार चिंतामणी मालवीय आणि आमदार मोहन यादवदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कुंदन चंद्रावत यांनी लोकप्रतिनिधींसमोर अनेक वादग्रस्त विधान केली. ‘गोध्राचे हत्याकांड विसरलात का? ५६ मारण्यात आले होते. २ हजार लोकांना कब्रस्तानाला पाठवले होते. जमिनीखाली गाडले होते, याच हिंदू समाजाने. आता तुम्ही ३०० प्रचारक आणि स्वयंसेवकांची हत्या केली आहे. डाव्यांनी ऐकून घ्यावे, तीन लाख लोकांचे शीर कापून त्यांची माळ भारत मातेला अर्पण करु,’ अशी चिथावणीखोर भाषा चंद्रावत यांनी वापरली होती.