तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तारखेची काल(शुक्रवार) निवडणूक आयोगाकडून घोषणा झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज(शनिवार) थुतूकुडी येथे पोहचले आहेत. या ठिकाणी त्यांचे समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी तेथील व्हीओसी महाविद्यालयात बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला. मोदी सरकार घटनात्मक संस्थांना उध्वस्त करत आहे त्यामुळे लोकांना संसद व न्यायपालिकेवर विश्वास राहिलेला नाही. अस राहुल गांधी म्हणाले आहेत.

“मागील सहा वर्षापासून देशाला एकसंध बनवून ठेवणाऱ्या सर्व निवडक संस्था व फ्री प्रेसवर पद्धतशीर हल्ला सुरू आहे. लोकशाही अचानक मरत नाही, ती हळूहळू मरते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संस्थात्मक संतुलन नष्ट केलं आहे.” असा राहुल गांधी यांनी आरोप केला आहे.

तसेच, “न्यायपालिका तसेच संसदेतही महिला आरक्षणासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. प्रत्येक जागी, भारतीय पुरुषांनी भारतीय महिलांकडे सारख्याच दृष्टीकोणातून पाहण्याची गरज आहे, ज्या दृष्टीने ते स्वतःकडे पाहतात.” असं देखील राहुल गांधी यांनी बोलून दाखवलं.

तामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागांसाठी एकाच टप्पयात मतदान होणार आहे. या साठी १२ मार्च रोजी अधिसूचना जारी होणार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ मार्च आहे. तर, उमेदवारी अर्जाची छाननी २० मार्च रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २२ मार्च असुन, मतदान ६ एप्रिल व मतमोजणी २ मे रोजी असणार आहे.