राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढील वर्षापासून संघाची पहिली सैनिकी शाळा सुरू करणार असल्याची माहिती आहे. या शाळेत भारतीय सैन्यात अधिकारी पदावर रूजू होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर, या शाळेच्या संचालनाची जबाबदारी संघाच्या विद्या भारतीकडे असणार आहे.

इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, या शाळेचे नाव माजी सरसंघचालक राजेंद्र सिंह यांच्या नावावरून ‘रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर’ असे असणार आहे. रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिरची पहिला शाखा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर येथे सुरू केली जाणार आहे. या ठिकाणी १९२२ मध्ये संघाचे माजी सरसंघचालक रज्जू भैय्या यांचा जन्म झाला होता.

शाळा सीबीएसई अभ्यासक्रमानुसार शिक्षण देणार असून इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत वर्ग असणार आहेत. २०२० मध्ये शाळेची पहिली तुकडी सुरू होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. इयत्ता सहावीच्या पहिल्या तुकडीत १६० विद्यार्थ्यांची नावनोंदणी होईल. यातील ५६ जागा शहिदांच्या मुलांसाठी राखीव असणार आहेत. या शाळेसाठी जवळपास ४० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर याचप्रमाणे अन्य ठिकाणी देखील शाळा सुरू केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या शाळेसाठी विद्या भारतीने माहितीपत्रक देखील तयार केले आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये नावनोंदणीसाठी अर्ज देखील मागवले जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीस संघाच्या विद्या भारतीच्यावतीने देशभरात जवळपास २० हजारांपेक्षा अधिक शाळा चालवल्या जातात.