मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून देशाच्या विविध राज्यांमध्ये जमावाकडून हत्यासत्र सुरु असतानाच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. अशा घटना रोखण्यासोबतच संवेदनशील परिसरांची निवड करुन तिथे अफवांविरोधात जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांना मारहाण केली. या मारहाणीत त्या पाचही जणांचा मृत्यू झाला. देशाच्या अन्य भागांमध्येही अशाच घटना घडत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी अॅडव्हायजरी जारी केली. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ही अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. ‘

जमावाकडून होणारे हत्यासत्र रोखण्यासाठी सर्व राज्यांनी तातडीने उपाययोजना करावी. अशा अफवांची वेळीच दखल घेऊन त्यादृष्टीने पावले उचलावीत. तसेच जिल्हा प्रशासनाने संवेदनशील भागांची यादी तयार करुन अशा भागांमध्ये या अफवांविरोधात जनजागृती मोहीम राबवावी, असेही केंद्रीय गृहखात्याने म्हटले आहे. अशा घटना घडल्यास पोलिसांनी तातडीने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेही गृहखात्याने म्हटले आहे.

तसेच, लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवरील विश्वास कायम राहाव यासाठी लहान मुलांचे अपहरणसारख्या गुन्ह्यांचा पोलिसांनी सखोल तपास करावा, असेही सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावर खोट्या आणि चिथावणीखोर संदेश पसरवण्यासाठीचे व्यासपीठ ठरु नये, यासाठी पावले उचलली होती. या माध्यमांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही, अशी समज सरकारने दिली होती.