एच. डी. कुमारस्वामी यांची कबुली

काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीचे सरकार चालवणे ही सोपी गोष्ट नसून ते माझ्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे, अशी कबुली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी युतीकडून निवडले गेलेले नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी मंगळवारी श्रृंगेरी येथे दिली.

कुमारस्वामी बुधवारी शपथ घेणार असून त्यांच्याबरोबर अन्यही काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार  असून जी. परमेश्वर बुधवारी शपथ घेतील. गुरुवारी कुमारस्वामी बहुमत सिद्ध करणार आहेत.

आद्य शंकराचार्य यांनी जेथे पहिला मठ स्थापन केला त्या श्रृंगेरीत दर्शनसाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ‘‘मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडू शकेन, असे मला वाटत नाही. लोकांमध्येही साशंकता आहे. ती केवळ माझ्याबद्दलच नाही, तर हे सरकार कामकाज उत्तमपणे पार पाडेल की नाही, याबद्दलही आहे. पण जगद्गुरू शंकराचार्य आणि शारदाम्बा देवी यांच्या आशीर्वादाने सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील, असा मला विश्वास वाटतो.

बुधवारी होणाऱ्या शपथविधीस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसप अध्यक्षा मायावती, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि अनेक प्रादेशिक नेते उपस्थित राहणार आहेत.

सरकार स्थापनेच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यावे आणि मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाचा वाटा दोन्ही पक्षांना कसा असावा, याचाही खल सुरू होता.

उपमुख्यमंत्री कोण हे काँग्रेसने ठरवावे..

उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळणार, हे स्पष्ट होत असून त्या पदावर शिवकुमार यांचे नावही चर्चेत होते. दलित नेते परमेश्वर यांनाही त्यासाठी पाठिंबा वाढत आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी लिंगायत नेत्याची निवड व्हावी, अशी मागणी सुरू आहे. शिवकुमार यांच्या नावाला एच. डी. देवेगौडा यांचा विरोध असल्याची चर्चा होती. पण देवेगौडा यांनीच ती फेटाळली. ते म्हणाले की, ‘‘आपल्या पदावर कोणाला नेमायचे हे काँग्रेसलाच ठरवायचे आहे. माझा भर केवळ सरकार विनाअडथळा चालावे, यावर आहे.’’