युक्रेनमध्ये गेले तीन महिने सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलकांवर रशियाने टीका केली असून आंदोलकांनी बंडाचाच प्रयत्न केला असल्याचा ठपका रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ठेवला आहे.  युक्रेनमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये नव्याने हिंसाचार उसळला असून त्यामध्ये आतापर्यंत २७ जण ठार झाले आहेत. युक्रेनमधील समस्येवर तोडगा काढण्यासाठी युरोपीय समुदायाचे दूत कीव येथे आले असून त्यांनी सुरू केलेल्या युद्धबंदी प्रयत्नांना या िहसाचारामुळे चांगलीच खीळ बसली आहे. युक्रेनमधील या हिंसाचारामुळे युरोपीय समुदायाच्या दूतांनी युक्रेनचे अध्यक्ष व्हिक्टर यानुकोवीच यांची हजेरी घेतल्यामुळे त्यांनी विरोधकांसमवेत समेटाची तयारी सुरू केली आहे.  
ओबामा यांची सावधगिरी
मात्र या घडामोडींमुळे सरकार पक्ष राजनैतिक पातळीवर एका बाजूला पडल्याचे चित्र निर्माण झाले. कीवच्या मुख्य भागात हजारो हेल्मेटधारी आंदोलकांनी निदर्शनांसाठी जय्यत तयारी केलेली असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मात्र या प्रयत्नांचे सावधपणेच स्वागत केले आहे.
युक्रेनमध्ये सध्या जे काही घडत आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी या अतिरेकी गटांवर पडत असल्याचे मत पुतिन यांनी व्यक्त केले.
दरम्यान, युक्रेनमध्ये आता मजबूत सरकारची आवश्यकता असल्याचे मत रशियाचे पंतप्रधान मिट्री मेदवेदेव यांनी गुरुवारी व्यक्त केले.
लोकांचे संरक्षण करा
युक्रेनमध्ये गुरुवारीच नव्याने झालेल्या हिंसाचारात १७ जण ठार झाले असल्यामुळे युक्रेनने प्रथम आपल्या लोकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी. तसे झाल्यानंतरच त्यांना पूर्णपणे आर्थिक सहकार्य देण्यात येईल, असे मेदवेदव यांनी स्पष्ट केले. आम्ही त्यांना दिलेली सर्व वचने पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.