करोनाप्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याचे जागतिक प्रयत्न 

‘स्पुटनिक लाइट’ या लशीला मान्यता मिळाल्याची माहिती रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने दिली आहे. ही एक मात्रेची लस आहे. त्याची परिणामकारकता ८० टक्के असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ‘स्पुटनिक लाइट’ लशीने लसीकरणाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा मुकाबला करणे सोपे होणार आहे.

रशियाच्या गमालेया इन्स्टिट्यूट या संस्थेने तयार केलेली स्पुटनिक लस कोविड विरोधात ७९.४ टक्के परिणामकारक आहे. ‘स्पुटनिक लाइट’ लशीची एक मात्रा १० डॉलर्सला मिळणार आहे. या लशीचीही निर्यात केली जाणार आहे. आरडीआयएफने निवेदनात म्हटले आहे, की एक मात्रेची ‘स्पुटनिक लाइट’ लसमात्रेची निर्यातही केली जाणार आहे. मात्रा दिल्यानंतर २८ दिवसांनी तपासणी केली असता त्यात चांगले परिणाम दिसून आले आहेत. ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ दरम्यान एक मात्रेच्या लशीच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

रशियातील पहिली दोन मात्रेची स्पुटनिक लस ९७.६ टक्के प्रभावी असून ३८ लाख लोकांवर प्रयोग करून हा निष्कर्ष काढण्यात आला होता. भारताला आतापर्यंत दोन मात्रेच्या दीड लाख स्पुटनिक लशी मिळाल्या असून आणखी दीड लाख मात्रा दोन दिवसात येणार आहेत. स्पुटनिक व्ही या लशीच्या  तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष मे अखेरीस हाती येण्याची शक्यता आहे. यात ७ हजार जणांवर चाचण्या करण्यात येत असून त्यात रशिया, संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांचा समावेश आहे.

एक मात्रेच्या ‘स्पुटनिक लाइट’ लशीच्या मात्रेचे फायदे सांगताना या संस्थेचे प्रमुख किरील दिमीत्रिव यांनी सांगितले, की या लशीमुळे जास्त लोकांची लसीकरण प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे सामुदायिक प्रतिकारशक्तीही लवकर निर्माण होईल.