वॉशिंग्टन : अमेरिकेतील २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपाबाबत दोन वर्षे करण्यात आलेल्या चौकशीअंती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निर्दोष ठरवण्यात आल्याची माहिती महाधिवक्ता विल्यम बार यांनी गुरुवारी दिली आहे. ट्रम्प यांची  प्रचार यंत्रणा व रशिया सरकार यांच्यात कुठलेही साटेलोटे नव्हते, किंबहुना त्याबाबत पुरावे सापडलेले नाहीत, असे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या रॉबर्ट म्युलर यांच्या चौकशी समितीने अहवालात म्हटले आहे.

गुरुवारी या चौकशी अहवालातील काही भाग जाहीर करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की, रशियन सरकारने अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता, पण रशियाच्या हस्तकांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांना अध्यक्ष ट्रम्प व त्यांच्या प्रचार मोहिमेतील वरिष्ठ अधिकारी यांनी सहकार्य केले नाही. या प्रकरणी चौकशी करण्याकरिता अ‍ॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांच्या कार्यालयातील वकील म्युलर यांना  उप महाधिवक्ता रॉड रोसेनस्टेन यांनी नेमल्याचे मे २०१७ मध्ये एफबीआय संचालकपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना समजले होते त्यावेळी सेशन्स यांच्या कार्यालयातील प्रमुख जॉडी हंट व व्हाइट हाउसचे वकील डॉनमॅकगन उपस्थित होते असे सीएनएनने म्हटले आहे.

चौकशीची बातमी समजताच अध्यक्ष ट्रम्प हे खुर्चीत मागे रेलून बसत असे म्हणाले होते की, हे तर फार भयानक आहे, हा माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीचा अंत आहे.  ट्रम्प खूप संतापले होते व रशियाच्या हस्तक्षेपाबाबत चौकशीतून सेशन्स यांनी माघार घेतल्याने ते भडकले. जेफ तुम्ही असे कसे होऊ दिलेत. तुम्ही माझे रक्षण कराल असे वाटले होते. त्यानंतर त्यांनी सेशन्स यांना राजीनामा देण्यास सांगितले त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला. त्यांचे राजीनामा पत्र ट्रम्प यांनी खिशात ठेवले व तुम्ही महाधिवक्ता पदावर राहण्यास तयार आहात का असे अनेकदा विचारले.  त्यावर ते तुम्हीच ठरवा असे उत्तर सेशन्स यांनी दिले होते. सेशन्स त्या पदावर राहू शकले असते पण नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांची ट्रम्प यांनी हकालपट्टी केली.

रशियाच्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले की, अमेरिकेच्या या चौकशी अहवालात रशियाच्या हस्तक्षेपाचे कुठलेही पुरावे देण्यात आलेले नाहीत त्यामुळे दोन्ही देशातील संबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

म्युलर यांना साक्षीसाठी पाचारण

म्युलर यांनी ट्रम्प यांना दोषमुक्त केले असले तरी डेमोक्रॅट सदस्य जेरी नॅडलर यांनी म्युलर यांना पत्र पाठवून २३ मे रोजी प्रतिनिधीगृहापुढे साक्ष देण्यास उपस्थित राहण्यास सांगितले आहे. महाधिवक्ता बार यांनी अहवालातील जो निवडक भाग सांगितला आहे त्यावर आमचा विश्वास नाही आम्हाला म्युलर यांचा अहवाल वाचावा लागेल  असेही त्यांनी म्हटले आहे.