परराष्ट्र सचिव जयशंकर यांची माहिती
लष्कर-ए-तय्यबा व जैश ए महंमद या दहशतवादी संघटनांच्या विरोधात अमेरिका व भारत यांचे सहकार्य वाढवले जाणार आहे, असे परराष्ट्र सचिव जयशंकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी परराष्ट्र सचिव जयशंकर अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी सांगितले की, या दोन दहशतवादी संघटनांच्या विरोधात दोन्ही देश एकत्रित काम करणार आहेत. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राइस यांची भेट घेतली, त्यात दोन्ही देशांनी या दहशतवादी संघटनांविरोधात एकत्रित काम करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, राइस व जयशंकर यांच्यात आगामी अणुसुरक्षा बैठकीच्या संदर्भात चर्चा झाली. हवामान बदल व द्विपक्षीय सहकार्य हे विषयही चर्चेला होते. दोन्ही देशांच्या नेत्यांची चर्चा होणार असून त्यात एकविसाव्या शतकाच्या दृष्टिकोनातून संबंधांना नवे परिमाण देणे गरजेचे आहे.जयशंकर यांनी काल व्यापार, परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी हे या महिन्यात अणु सुरक्षा शिखर बैठकीसाठी अमेरिकेला जात असून त्यांची अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी भेट होणार आहे.