पाकिस्तानचा माजी क्रिकेट शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावरुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. उगाच बाहेरच्या लोकांनी येऊन आम्ही काय करावं ते शिकवू नये अशा शब्दांत सचिनने शाहिद आफ्रिदीला सुनावलं आहे. शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावरुन अनेक भारतीय क्रिकेटर्सनी आपलं परखड मत मांडत त्याच्यावर टीका केली आहे. कपिल देव, विराट कोहली, सुरेश रैना आणि गौतम गंभीर यांच्यानंतर सचिन तेंडुलकरनेही शाहिद आफ्रिदीला त्याची जागा दाखवून दिलं आहे.

आफ्रिदीच्या वक्तव्यावर बोलताना सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे की, ‘आमचा देश चालवायला आमच्याकडे सक्षम लोक आहेत. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला माहिती घेण्याची किंवा आम्ही काय करावं हे सांगण्याची गरज नाही’.

शाहिद आफ्रिदीच्या विषयावर प्रश्न विचारल्यावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव तर भडकले होते. आफ्रिदीला इतके का महत्व दिले जातेय ? त्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तो कोण आहे ? त्याला आपण इतके महत्व का देतोय? काही लोकांना आपण उगाचच महत्व देऊ नये असे कपिल देव म्हणाले.

सुरेश रैनानेही टि्वट करुन काश्मीरच्या प्रश्नावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून तो कायम भारताचाच भाग राहिल हे पाकिस्तानने ध्यानात घ्यावे असे टि्वट रैनाने केले आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी लष्कराला काश्मीरमध्ये दहशतवाद, छुपे युद्ध थांबवायला सांगावे. आम्हाला रक्तपात नको तर शांतता हवी आहे असे रैनाने टि्वटमध्ये म्हटले आहे.

माझ्यासाठी देश पहिला – विराट
जी कुठली गोष्ट भारताच्या हिताला बाधा पोहोचवेल त्याचे मी कधीच समर्थन करणार नाही. एक भारतीय म्हणून देशाच्या हितालाच तुमचे पहिले प्राधान्य असेल. मी सुद्धा देशाच्याच भल्याचा विचार करतो. कोणी त्या विरोधात असेल तर मी कधीच समर्थन करणार नाही. एखाद्या विषयावर मत प्रदर्शन करणे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे. एखाद्या विषयाचे पूर्ण ज्ञान असल्याशिवाय त्यावर बोलणे मला योग्य वाटत नाही. पण तुमचे पहिले प्राधान्य देशालाच असले पाहिजे असे कोहली म्हणाला.

दरम्यान शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत पाकिस्तान काश्मीरमध्ये समोसे आणि भजी तळायचा स्टॉल लावून बसलेला नाही असं म्हटलं आहे. तुम्ही उगाचच हा विषय वाढवत आहात असा आरोपही शाहिद आफ्रिदीने भारतावर केला आहे.