काळवीट शिकारप्रकरणात अभिनेता सलमान खानविरोधात साक्ष देणारे चोगराम हे मानसिकरित्या सक्षम नसल्याने त्यांचे या प्रकरणातून नाव वगळण्यात यावे अशी मागणी चोगराम यांच्या मुलाने केली आहे. चोगाराम(६५) हे सोमवारी न्यायालयात उपस्थित राहू शकलेले नाहीत.
काळवीट शिकारप्रकरणाची जोधपूर न्यायालयात सुनावणी सुरु असून सोमवारी चोगाराम यांना जबाबाकरिता न्यायालयात हजर राहावयाचे होते. मात्र ते अनुपस्थित होते. चोगाराम यांची मानसिक स्थिती चांगली नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे आपल्या वडिलांचे नाव प्रकरणातून वगळण्यात यावे अशी मागणी चोगाराम यांच्या मुलाने न्यायालयाकडे केली. तसेच, जोधपूर व अहमदाबादमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला. पण, न्या.शिवानी भटनागर यांनी २७ जुलैपर्यंत चोगाराम यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सलमानविरुद्ध असलेल्या शिकारप्रकरण आणि अवैधरित्या शस्त्र बाळगणे या दोन्हींचे चोगाराम हे मुख्य साक्षीदार आहेत. सलमान आणि इतर कलाकारांना शिकारीला जाण्यापूर्वी मी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते ऐकले नाहीत, असा दावा चोगाराम यांनी केला होता. त्यामुळे चोगाराम यांना मनोरुग्ण सिद्ध करून सलमान याप्रकरणातून सुटतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.