‘पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत..’ असे म्हणणाऱ्या सलमानवर शिवसेनेचे खासदार सुभाष देसाई यांनी तीर मारला आहे. सलमान खानने कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी प्रथम ‘डॅडी’ सलीम खान यांचा सल्ला घ्यावा, असे देसाई यांनी म्हटले आहे. देशात १.२५ अब्ज लोक असताना आपल्याला पाकिस्तानमधून कलाकारांची आयात का करावी लागते, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणाऱ्या सलमानला प्रसारमाध्यमांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’विषयी त्याचे मत विचारले असता ‘सर्जिकल स्ट्राईक’चा भारताने घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यानंतर सलमानने पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवरही आपले मत मांडले. ‘पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत, ते कलाकार आहेत. ते कलाकार अधिकृतपणे भारतात येतात. येथे काम करण्यासाठी लागणारा व्हिसा हा आपल्या सरकारकडूनच त्यांना दिला जातो. दहशतवादी आणि कलाकार यांच्यात फरक आहे.’ असे सलमानने म्हटले होते.
काही दिवसांपूर्वी ‘सुलतान’ चित्रपटाविषयी बोलताना सलमानने वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘शूटींगच्या त्या सहा तासांमध्ये बरीच मेहनत घ्यावी लागत होती; जेव्हा मी शूटींग आटपून रिंगणातून बाहेर यायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेप्रमाणे वाटायचे.’ सलमानच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सलीम खान यांनी सारवासारव करत सलमानचा बचाव करताना दिसले होते. त्यामुळेच पाकिस्तान कलाकारांविषयी प्रेम व्यक्त केल्यानंतर सुभाष देसाई यांनी सलमान खानला बोलण्यापूर्वी वडिलांशी विचारपूस करावी,असा टोमणा मारला.