भारतामधील प्रसिद्ध मसाला कंपनी असणाऱ्या एमडीएचचे मसाले अमेरिकेने परत पाठवले आहेत. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्राधिकरणाने एमडीएचचे तीन मोठ्या ऑर्डर भारतात परत पाठवल्या आहेत. एमडीएचच्या सांबर मसाल्यांमध्ये अन्नामधून विषबाधा होण्यासाठी कारणीभूत असणारे साल्मोनेला जीवाणू (बॅक्टेरिया) असल्याचे चाचणीत दिसून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

‘एमडीएचच्या प्रोडक्टच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) काही चाचण्या केल्या. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या मसाल्यांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असल्याचे निष्पण्ण झाले,’ असं अमेरिकन एफडीएने ७ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकामध्ये नमूद केले आहे. परत पाठवण्यात आलेला सांबर मसाल्याची पाकिटे उत्तर कॅलिफोर्नियामधील रिटेल स्टोर्समध्ये विक्रिसाठी भारतातून अमेरिकेत निर्यात करण्यात आली होती. एमडीएचसाठी या मसाल्यांची निर्मिती आर प्युअर अॅग्रो स्पेसलिस्ट या कंपनीने केली होती. तर त्याचे वितरण हाऊस ऑफ स्पाइस (इंडिया) कंपनीने केले होते. आर प्युअर बोर्डाचे संचालक हे एमडीएचच्या संचाकल मंडळातही असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

अमेरिकन एफडीएने जारी केलेल्या पत्रकामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असलेले पादर्थ खाल्ल्यास अतिसार, ओटीपोटात दुखणे, ताप येणे यासारखे आजार होऊ शकतात असा इशाराही नागरिकांना दिला आहे. हे आजार चार ते पाच दिवसात कोणत्याही उपचाराशिवाय बरे होत असले तरी कधीकधी अधिक त्रास झाल्यास उपचारांसाठी थेट रुग्णालयातही दाखल करावे लागते असंही एफडीएने म्हटले आहे. ‘वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना साल्मोनेला बॅक्टेरियामुळे त्रास होण्याची शक्यता अधिक जास्त असते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्ती बॅक्टेरियामुळे लवकर आजारी पडू शकतात,’ असा इशाराही एफडीएने दिला आहे.

अमेरिकेत निर्यात करण्यात येणारेच मसाले भारतात वितरित केले जातात का याबद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही असं ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.