पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ज्योतिरादित्य सिंधिया कानमंत्र देतानाच्या व्हिडिओवरुन स्मृती इराणींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली असतानाच आता संजय निरुपम यांनी स्मृती इराणींवर पलटवार केला आहे. मोदींनी भाषणापूर्वी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी, म्हणजे मोदींना पाप लागणार नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला होता. प्रसारमाध्यमांसमोर काय बोलावे, याबाबत सिंधिया त्यांना मार्गदर्शन करत होते. मोदी जे करू शकले नाहीत ते मी करून दाखवले आहे हे तुम्हाला प्रसारमाध्यमांना सांगायचे आहे असे ज्योतिरादित्य सिंधियांनी राहुल गांधींना सांगितले. पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी हा प्रकार घडला होता. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. स्मृती इराणींनी हा व्हिडिओ ट्विट करत राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. ‘हल्ली स्वप्न दाखवण्यासाठीही ट्यूशन घ्यावी लागते’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

स्मृती इराणींच्या या ट्विटवर संजय निरुपम यांनी पलटवार केला. निरुपम म्हणाले, मोदीजी म्हणतात १२५० कोटी घरं बांधून दिली. पण देशातील लोकसंख्या फक्त १२५ कोटी आहे. मोदी सांगतात देशातील ६०० कोटी मतदारांनी मत दिले, पण देशाची लोकसंख्या फक्त १२५ कोटी इतकी आहे. मोदींनी भाषणापूर्वी सहकाऱ्यांशी चर्चा करावी. त्यांना पाप लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत काय म्हटले होते राहुल गांधी?
नरेंद्र मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज माफ केलेलं नाही. आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन कर्जमाफीची मागणी करु. कर्जमाफीसाठी आम्ही मोदी सरकारला भाग पाडू. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मोदी सरकारला झोपू देणार नाही असं राहुल गांधींनी म्हटले होते.