News Flash

WHO ला काय कळतं म्हणणाऱ्या राऊतांनी आता ‘ब्रेक द चेन’साठी दिला WHO चाच संदर्भ, म्हणाले…

राज्यामध्ये 'ब्रेक द चेन'अंतर्गत नवीन निर्बंध लागू करण्यात आलेत

प्रातिनिघिक फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि पीटीआयवरुन साभार)

जागतिक आरोग्य संघटनेवर काही महिन्यांपूर्वी टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता राज्यात लागू केलेल्या कठोर निर्बंधांची पाठराखण करताना जागतिक आरोग्य संघटनेचाच हवाला दिलाय. जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं, अशा आशयाची टीका केल्यामुळे काही महिन्यांपूर्वी राऊत यांच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र आता राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राज्यात लागू केलेल्या कठोर निर्बंधांमागे डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या सुत्राचाच आधार घेण्यात आल्याचं सांगितलं आहे.

राज्यातील लॉकडाउनसंदर्भात पत्रकारांनी छेडलं असता राऊत यांनी, राज्याराज्यातील परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्बंध अधिक कठोर करण्याचे आदेश दिलेत,” असं सांगितलं. यावरुन कठोर निर्बंधांऐवजी लॉकडाउनच्या बाजूने मंत्र्यांची मतं होती असं विचारण्यात आलं असता, “महाविकास आघाडीतील नाही तर सरकारमधील सर्व मंत्र्यांची मागणी आहे की कडक लॉकडाउन लावला पाहिजे,” असं सांगितलं. कठोर लॉकडाउन हा एकमेव पर्याय आहे असं राऊत यांनी सांगताना जागतिक आरोग्य संघटनेचा संदर्भही दिला. “जर ब्रेक द चेन म्हणजेच साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाउनशिवाय पर्याय नाही हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं सुत्रं आहे. त्यानुसारच हे सांगितलं जात आहे,” असं राऊत म्हणाले.

देशामधील करोनाबाधितांची संख्या सध्या जेवढी समोर येतेय त्यापेक्षा अधिक असल्याचं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. “देशातील अनेक भागांमध्ये चाचण्याच केल्या जात नाहीयत. महाराष्ट्रात चाचण्या खूप होत असल्याने ६३ हजार रुग्ण आढळून आलेत. त्यामुळेच करोनाबाधितांचा एकूण आकडा हा तीन लाखांच्या पुढे आहे. सध्या करोनाचा जो स्ट्रेन आहे हा स्ट्रेन फार गंभीर आहे,” असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

आधी डब्लूएचओवर केली होती टीका

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये राऊत यांनी जागतिक आरोग्य संघटनेनं चांगलं काम केलं असतं तर जगभरामध्ये करोनाचा फैलाव झाला नसता असं मत व्यक्त केलं होतं. यावेळी राऊत यांनी डॉक्टरांची तुलना वॉर्डबॉयशी करुन त्यांचा अपमान केल्याचीही टीका झाली होती. मात्र आपण कोणाचाही अपमान केलेला नाही असं राऊत यांनी १८ ऑगस्ट २०२० रोजी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं होतं.

आरोग्यमंत्र्यांना उत्तर देतानाही दिलेला डब्ल्यूएचओचा संदर्भ….

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत करोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही राज्ये लशीचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळीही त्यांना उत्तर देताना राऊत यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा संदर्भ दिला होता. “महाराष्ट्र सरकार आपलं अपयश लपवत नाही. या बाबतीत राजेश टोपेच जास्त सांगू शकतील. पण महाराष्ट्राला कमी लेखण्याचा, संकटात आणण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्हाला हर्षवर्धन यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. महाराष्ट्र सरकार काय करत आहे याची दखल जागतिक आरोग्य संघटनादेखील घेत आहे. गुजरात हायकोर्टानेही दखल घेतली आहे. महाराष्ट्र एक मोठं राज्या असून सर्वात जास्त दबाव आहे. आर्थिक, लस, वाढती रुग्णसंख्या अशा अनेक गोष्टींचा दबाव आहे. केंद्र आणि राज्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता जनतेची सेवा केली पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 12:56 pm

Web Title: sanjay raut says break the chain decisions related to corona are as per who guidelines scsg 91
Next Stories
1 “…तर ते लोकांच्या जिवाशी का खेळतायत?”; संजय राऊतांनी योगी, रुपाणींवर साधला निशाणा
2 महाराष्ट्राला ८० हजार रेमडेसिवीरची गरज असताना गुजरातमध्ये मोफत वाटप सुरुय : संजय राऊत
3 करोना संकटात देशाच्या मदतीसाठी भारतीय हवाई दलाचं उड्डाण
Just Now!
X