कोलकाता : शारदा चिट फंड घोटाळ्याच्या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी राजीव कुमार हे शुक्रवारी पुन्हा एकदा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त असलेल्या राजीवकुमार यांच्यावर कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी करीत असताना पुरावे नष्ट केल्याचा किंवा ती दडपून ठेवल्याचा  आरोप आहे. गेल्या शनिवारपासून कुमार यांनी तिसऱ्यांदा सीबीआयला गुंगारा दिला आहे. त्यांना सॉल्ट लेक येथील सीजीओ संकुलात असलेल्या सीबीआय संकुलात उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी करण्यात आले होते पण ते उपस्थित राहिले नाहीत. सीबीआयचे विशेष पथक राजीव कुमार यांच्या शोधात असून सध्या ते गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक आहेत. त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला असता ते सापडले नाहीत. पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात सीबीआयने म्हटले आहे की, राजीव कुमार यांच्याशी संपर्क साधता येईल असा दूरध्वनी क्रमांक देण्यात यावा.

राजीव कुमार हे पश्चिम बंगाल सरकारने शारदा चिट फंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीचे प्रमुख होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली होती. सीबीआयने गुरुवारी अलिपूर न्यायालयाकडून राजीव कुमार यांना अटक करण्याचे वॉरंट देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून असे म्हटले होते की, राजीवकुमार यांच्या अटकेची स्थगिती उठवल्याने आता त्यांना अटक करण्यास वॉरंटची गरज नाही. शारदा समूहाच्या कं पन्यांनी लोकांना २५०० कोटी रुपयांना गंडा घातला होता. त्यात भरपूर परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते.