कोटय़वधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी शारदा समूहाचे अध्यक्ष सुदिप्तो घोष यांना दोषी ठरवून बिधाननगर न्यायालयाने शुक्रवारी त्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
शारदा उद्योग समूहाच्या माध्यमातून सेन यांनी विविध नावाने अनेक गुंतवणूक योजना राबविल्या होत्या. मात्र या योजनांद्वारे तुंवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. याशिवाय सेन यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचेही अफरातफर केल्याची न्यायालयात कबुली दिली. न्यायालयाच्या शिक्षेनुसार सेन यांनी दंडाची रक्कम भरली नाही तर त्याबदल्यात त्यांना आणखी सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
चिटफंड घोटाळा उघडकीस आल्यानंतर सेन यांना एप्रिल २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात शिक्षा भोगत असल्यामुळे न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या कालावधी कमी होणार आहे.
दरम्यान, सेन याने चिटफंडच्या माध्यमातून पश्चिम बंगाल तसेच इतर राज्यांमधील लाखो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात फसवणुकीची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत.