दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर  आलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अक्षय लकरा यांनी गुरूवारी कथितरित्या काळे फासले असल्याची घटना घडली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर सुभाषचंद्र बोस, भगतसिंह आणि विनायक दामोदर सावरकर यांचे पुतळे बसवण्यात आले होते. यावरून विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एनएसयूआयकडून यावर आक्षेप नोंदवत सांगण्यात आले होते की, सुभाषचंद्र बोस व भगतसिंह यांच्याबरोबर एकाच जागी सावरकरांचा पुतळा नाही बसवला जाऊ शकत. त्यानंतर एनएसयूआयचे दिल्ली प्रदेशाध्य़क्ष अक्षय लकरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरूवारी पहाटे सावरकरांच्या पुतळ्यास काळे फासले व ‘भगत सिंह अमर रहें और बोस अमर रहें’ अशी घोषणाबाजी केली असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अक्षय लकरा यांनी म्हटले की, ते बोस आणि भगतसिंह यांच्या बरोबरीने सावरकरांचा पुतळा रातोरात कसा बसवू शकतात. विशेष म्हणजे  विद्यापीठाने देखील याबाबत मौन धारण केले होते. त्यांनी यावेळी विद्यापीठ अभाविपच्या इशाऱ्यांवर काम करत असल्याचाही आरोप केला. तर अभाविपकडून हे निंदनीय कृत्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अभाविपच्या मोनिका चौधरी यांनी याबाबत म्हटले आहे की, काल रात्री दिल्ली विद्यापीठातील वीर सावरकर यांच्या पुतळयाची एनएसयूआयकडून विटंबना करण्यात आली आहे व हे एक निंदनीय कृत्य आहे. खालच्या पातळीवरील राजकारणातून करण्यात आलेले हे कृत्य भारताच्या महान स्वातंत्र्यवीरांबद्दलचा काँग्रेसचा विचार दर्शवते. त्यांनी हे देखील सांगितले की, अभाविप विद्यार्थ्यांना एनएसयूआय आणि त्यांच्या  मुळ संघटनेच्या नकारात्मक विचारांबद्दल माहिती देईल. या निंदनीय कृत्याबद्दल अभाविप प्रशासनाकडे स्वांतत्र्य सेनानींचा अपमान करण्यात सहभागींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे.