देशातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय आता बचत खात्यात किमान रक्कम न ठेवणाऱ्या खातेदारांकडून दंड आकारणार आहे. अधिकाधिक लोकांनी खाते उघडावे, यासाठी काही वर्षांआधी एसबीआयकडून खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची मर्यादा रद्द करण्यात आली होती. मात्र यामध्ये आता बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून दंड म्हणून शुल्क आकारण्यात येणार असल्याचे एसबीआयने म्हटले आहे. १ एप्रिल २०१७ पासून हे शुल्क आकारले जाईल, अशी माहिती एसबीआयकडून देण्यात आली आहे.

एसबीआच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, शहरातील एसबीआयच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात किमान ५ हजार रुपये इतकी रक्कम शिल्लक ठेवावी लागते. एखाद्या ग्राहकाने किमान रक्कम बँक खात्यात न ठेवल्यास त्याला ५० रुपये अधिक सेवा कर अशी रक्कम शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. बँक खात्यात किमान रकमेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम असल्यास हे शुल्क आकारले जाईल. तर बँक खात्यातील रक्कम किमान रकमेपेक्षा ५० ते ७५ टक्क्यांनी कमी असल्यास खातेधाराकडून ७५ रुपये अधिक सेवा कर अशी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येईल. तर बँक खात्यातील रक्कम किमान रकमेपेक्षा ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास १०० रुपये अधिक सेवा शुल्क अशी रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे.