२० लाख रूपयांच्या जुन्या नोटा बदलून दिल्याचा आरोप असणाऱ्या एका बँकेच्या रोखपालाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी सकाळी समोर आली. जी. रविराज (वय ५७) असे आत्महत्या केलेल्या रोखपालाचे नाव असून ते बंगळुरू येथील बँक ऑफ म्हैसूरच्या अॅव्हेन्यू रोड शाखेत कार्यरत होते.
रविराज हे पत्नी दोन मुलांसह वनारपेठ विवकेनगर येथील दोन मजली घरात राहत होते. बुधवारी सकाळी रविराज हे नेहमीप्रमाणे फिरायला जाऊन आल्यानंतर थेट पहिल्या मजल्यावरील स्टडी रूममध्ये गेले आणि गळफास घेतला.
रविराज हे सहसा स्टडी रूममध्ये जात नाहीत. बराच वेळ झाला ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने घरातील सर्व खोल्या तपासल्या. त्यावेळी रविराज हे स्टडी रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांना लगेच बंगळुरू येथील सेंट फिलोमेनिया रूग्णालयात हलवण्यात आले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लेडी कर्झन रूग्णालयात नेल्याचे मृत रविराज यांचे बंधू जी. गोपालराज यांनी सांगितले.
रविराज यांच्याविरोधात चौकशी सुरू असल्याचे कुटुंबीयांना माहित होते. पण त्याची विस्तृत माहिती त्यांच्याकडे नव्हती, असेही गोपालराज यांनी म्हटले. रविराज हे १९७८ पासून स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये कार्यरत होते. लिपिक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. आतापर्यंतच्या त्यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली होती. या घटनेमुळे आम्हाला धक्का बसल्याचे गोपालराज यांनी म्हटले.

दरम्यान, सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या २ हजारांच्या नोटा असलेल्या २० लाख रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर प्राथमिक आरोप आहे. बँकेच्या इतर शाखांना नोटा पुरवण्याच्या विभागाचे रविराज हे प्रमूख होते. काही दिवसांपूर्वी चिकपेठ येथील बसवराजा मार्केट शाखेत भरण्यासाठी त्यांनी पैसे काढले होते. परंतु, ते पैसे त्यांनी त्या शाखेत भरले नाहीत. पुन्हा ते पैसे त्यांनी करन्सी मॅनेजमेंट शाखेत भरले. याच शाखेचे ते मुख्य रोखपाल आहेत.
पुन्हा मुख्य शाखेत भरलेल्या ४० लाख रूपयांत २० लाख रूपये हे चलनातून बाद झालेल्या ५०० रूपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात होत्या. कोणतेही कागदपत्रे न घेता त्यांनी २० लाख रूपयांच्या नव्या नोटा बदलून दिल्या होत्या. बँकेने त्यांनी या प्रकरणी निलंबितही करण्यात आले होते. सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. परंतु रविराज यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट ठेवली नसल्याने कारण समजलेले नाही. आत्महत्येप्रकरणी विवेकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.