२०१०मध्ये झालेल्या एका बलात्कारप्रकरणी वादग्रस्त स्वामी नित्यानंद याला पौरुषत्वाची चाचणी करावीच लागणार आहे. ही चाचणी करण्याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात नित्यानंदने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्याची ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
बलात्कारप्रकरणात अशा प्रकारच्या चाचण्या अलीकडच्या काळात आवश्यक झालेल्या आहेत, मग स्वामी नित्यानंद त्याला विरोध का करत आहेत, असा सवाल न्यायालयाने मागील सुनावणी वेळी विचारला होता. अशा चाचण्या आवश्यक असताना त्यास विलंब का लागला. चार वर्षांपूर्वी झालेल्या या बलात्कारात या चाचण्या करण्यास इतका विलंब लागण्याचे कोणतेही कारण नव्हते, असे सांगून न्यायालयाने पोलिसांकडून विलंबाबाबत स्पष्टीकरण मागविले आहे.
माझी अशा प्रकारे चाचणी करण्यापूर्वी काही मर्यादा पाळायला हव्या. मी धर्मगुरू असल्याने अशा प्रकारचे कृत्य करणार नाही. माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेनेही असे काही घडले नसल्याचे म्हटल्याचा दावा नित्यानंद याने केला.