मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली. उच्च न्यायालयाने सलमान खानला निर्दोष मुक्त केल्यानंतर या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने सलमानला नोटीस बजावली.
उच्च न्यायालयाने सलमानवर ठेवलेल्या सर्व आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता केली. तसेच सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षाही रद्द केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल, अशी शिफारस करणारा अहवाल सरकारी वकिलांकडून गेल्या आठवड्यातच गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा केल्यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्यांअभावी सलमान खानची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षाने न्यायालयात दाखल केलेल्या पुराव्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.