बालविज्ञान काँग्रेसमध्ये कोल्हापूरच्या ‘झेविअर्स’मधील मुलांचा प्रकल्प

रसिका मुळ्ये, फगवाडा

प्रयोगशाळेतील उपकरणांपासून वंचित राहणाऱ्या ग्रामीण भागांतील अनेक विद्यार्थ्यांचा ‘मायक्रोस्कोप’चा प्रश्न कोल्हापूरच्या सेंट झेविअर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोडवला आहे. अवघ्या वीस रुपयांमध्ये त्यांनी तयार केलेला मायक्रोस्कोप भारतीय विज्ञान काँग्रेसच्या बालवैज्ञानिक मेळाव्यात लक्ष वेधून घेत आहे.

या मायक्रोस्कोपमध्ये शाळेत अभ्यासल्या जाणाऱ्या स्लाइड्स, बारीक कीटक यांचे निरीक्षण सहजपणे करता येते. मोठी स्क्रीन हवी असल्यास ही लेन्स टॅबलाही जोडता येणे शक्य आहे. मोबाइल फोनमधील वायफाय, ब्लूटूथचा वापर करून एकावेळी ही प्रतिमा संपूर्ण वर्गाला दाखवता येणे शक्य आहे. त्याचे छायाचित्र घेणेही शक्य आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना वाचण्यासाठी, त्वचारोगतज्ज्ञांना तपासणीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. ज्ञानीराजे सूर्यवंशी आणि सिद्धांतराजे सूर्यवंशी या भावंडांनी हा प्रकल्प साकारला आहे. त्यांना शिक्षिका ऊर्मिलादेवी पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे.

याबाबत ज्ञानीराजे हिने सांगितले की, ‘‘माझी आई पीएचडी करत होती. ती परिषदांमध्ये सादरीकरण करताना लेसर पॉइंटर वापरायची. बिघडलेला लेसर पॉइंटर मी एकदा उघडला. त्यात लेन्स मिळाली. फोनबरोबर खेळत असताना असे काही होऊ शकते हे लक्षात आले. त्यानंतर मी अनेक वेगवेगळ्या लेन्स वापरून पहिल्या. यासाठी अगदी दाराला लावण्यात येणारे आयहोलही वापरता येईल. पण सर्वात चांगले चित्र हे लेसर पॉइंटरच्या लेन्समधून दिसले.’’

काय आहे  यात?

जवळपास प्रत्येकाच्या हाती असणाऱ्या स्मार्ट फोनचा कल्पक वापर करून मायक्रोस्कोप विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. त्यासाठी खर्च आला अवघे वीस रुपये. एक केसाला लावण्याची पिन (हेअर पिन), कॅमेरा असलेला फोन आणि लेसर पॉइंटरमधील लेन्स एवढेच यासाठीचे साहित्य. बाजारात सहजपणे टॉर्च नादुरुस्त झाला तरी त्यातील लेन्स बहुतेक वेळा चांगल्या स्थितीत असते. ही लेन्स फोनच्या कॅमेराला जोडून हा मायक्रोस्कोप तयार केला आहे.