आपल्या विश्वातील दीर्घिकांना बांधून ठेवणाऱ्या कृष्णद्रव्याचा नकाशा तयार करण्यात आला असून त्यातील प्राथमिक माहिती जाहीर करण्यात आली आहे. कृष्णद्रव्य काळानुसार कसे बदलत जाते याचाही शोध यात घेण्यात आला आहे. वैज्ञानिकांच्या मते कृष्ण ऊर्जेचा वेध घेणे मात्र याहूनही अवघड असणार आहे. कृष्णद्रव्याच्याा या नकाशात एकअष्टमांश आकाशाचा समावेश असून त्यात ०.४ टक्के कृष्ण्द्रव्याचा वेध घेण्यात आला आहे. कृष्णद्रव्य हे दीर्घिकांना बांधून ठेवत आहे व ते दोन दीर्घिकांमधील पोकळीत सामावलेले आहे.
डार्क एनर्जी सव्‍‌र्हे या पाहणीचे निष्कर्ष अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या बैठकीत सादर करणार असून नंतर अ‍ॅरॅक्झिव्ह या प्रीप्रिंट सव्‍‌र्हरवर ही माहिती टाकली जाणार आहे. या सर्वेक्षणात जगातील सहा देशांच्या ३०० वैज्ञानिकांनी भाग घेतला असून जगातील अत्युत्तम डिजिटल कॅमेऱ्याने प्रतिमा घेतल्या आहेत. ५७० मेगापिक्सेलचा कॅमेरा हा व्हिक्टर ब्लांको टेलिस्कोप केंद्रात लावण्यात आला होता. चिलियन अँडीज पर्वतातील सेरो टोलोलो येथे ही दुर्बीण बसवण्यात आली आहे. कृष्णद्रव्याचा बारीकसारीक तपशील मिळवणे अवघड असते कारण त्याचे अस्तित्व शोधणे हे दूरस्थ दीर्घिकांकडून येणारा प्रकाश वाकतो या गुणधर्मावर अवलंबून असते.
जे दिसत नाही असे कृष्णद्रव्य शोधून काढणे अवघड असले तरी आम्ही तो प्रयत्न केला आहे, असे मॅँचेस्टर विद्यापीठातील खगोलभौतिकीच्या प्राध्यापक सारा ब्रिडल यांनी म्हटले आहे.
प्रा. ब्रिंडल यांच्या मते, आकाशाच्या नकाशाकडे पाहून आपण कृष्णद्रव्य कुठे आहे व कुठे नाही हे सांगू शकलो तर त्यातून आपले मोठे स्वप्न पूर्ण होईल. बऱ्याच काळानंतर हा प्रयत्न काही अंशी यशस्वी झाला आहे. दोन वर्षांपूर्वी हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते व ते आणखी तीन वर्षे चालणार आहे. कॅमेऱ्याने घेतलेल्या चाचणी प्रतिमांचा वापर या नकाशात करण्यात आला आहे. या माहितीचे संस्करण करण्यास फार मोठा कालावधी लागणार असून सध्या तरी त्यात बरीच माहिती आहे व तो ३० पट मोठा करून त्याचा अभ्यास करावा लागेल असे ब्रिंडल यांचे म्हणणे आहे. आकाशाच्या एकूण चार प्रतिमांमधून एक मोठा पट्टा अभ्यासण्यात आला आहे. गुरुत्वीय भिंगाचा परिणाम टाळून या नकाशाचे निरीक्षण करणे मोठी अवघड गोष्ट आहे.  कारण त्यामुळे प्रकाश विचलित होण्याच्या क्रियेत हा वेगळाच घटक काम करतो व त्यामुळे निरीक्षणांवर परिणाम होऊ शकतो.
गेल्या दोन वर्षांत २० लाख दीर्घिकांचे आकार प्राथमिक प्रतिमांवरून मोजण्यात आले आहेत. त्याची अचूकता ०.१ टक्के आहे, त्यासाठी हजारो तास संगणकाच्या माध्यमातून काम करावे लागते. नवीन नकाशात कृष्णद्रव्य आकाशाच्या नेमक्या कुठल्या पट्टय़ात आहे हे दिसून येते.
स्वीस फेडरल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे चिहवे चँग यांच्या मते आपण विश्वाची जी संकल्पना आतापर्यंत मांडलेली पाहतो त्याच्याशी सध्याचा आमचा नकाशा जुळणारा आहे. हा नकाशा मोठा करून दीíघकांमधील कृष्णद्रव्य त्यांना कसे बांधून ठेवते हे सांगता येऊ शकेल. वैश्विक काळात कृष्णद्रव्य कसे टिकून राहिले हेही समजेल. कृष्णऊर्जेच्या संकल्पनेची तपासणी यातून करणे शक्य आहे, असे प्रा. ब्रायडल यांचे म्हणणे आहे.

कृष्णद्रव्य दिसत नाही..
कृष्णद्रव्य दिसत नसले तरी ते दीर्घिकांवर प्रभाव टाकीत आहे व त्यांना एकत्र बांधून ठेवीत आहे. विश्वाचे प्रसरण हे जास्त अंतरावर जास्त गतीने होते आहे, कृष्णऊर्जा ही त्यातील एक कारणीभूत घटक असून तो गुरुत्वाच्या विरोधात काम करीत आहे. सध्याच्या सिद्धांतानुसार विश्वात ७५ टक्के कृष्णऊर्जा, २१ टक्के कृष्णद्रव्य, तर ४ टक्के द्रव्य (दृश्य स्वरूपातील) अशी विभागणी आहे.