मलेशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाच्या कॉकपिटमधून उच्चारले गेलेले शब्द नेमके काय होते, यावरून प्रवाद निर्माण झाला असून, अगोदर जाहीर करण्यात आल्याप्रमाणे ऑल राइट गुड नाईट असे हे शब्द नव्हते, तर गुड नाईट मलेशियन थ्री सेव्हन झीरो असे शेवटचे शब्द होते असे मलेशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कॉकपिटमधून उच्चारल्या गेलेल्या शेवटच्या शब्दांबाबत इतक्या दिवसांनी मलेशियन अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला आहे.
चार आठवडय़ांनी हा खुलासा मलेशियन अधिकाऱ्यांनी चीनकडून झालेल्या माहिती लपवण्याच्या आरोपामुळे केला असावा. चीनने मलेशियावर विमानाचा शोध नीट घेतला जात नसून, मलेशियाने माफी मागावी अशीही मागणी केली आहे. दरम्यान, बेपत्ता विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ३० दिवसांतच हा ब्लॅक बॉक्स मिळाल्यास अपघाताचे योग्य कारण समजू शकते. त्यामुळे आता २४ दिवस झाले असून पुढील आठ दिवसांत ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर त्याचा काहीही फायदा होणार नाही, असे विमानाचा शोध घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेने पाठवलेले पिंगर लोकेटर यंत्र लावलेले ओशनफिल्ड हे जहाज सोमवारी सागराकडे निघाले असून, ते संबंधित ठिकाणी पोहोचण्यास दोन-तीन दिवस लागतील. रडारमधील व उपग्रहांनी दिलेल्या माहितीचे कसून विश्लेषण केल्यानंतर दक्षिण िहदी महासागरात ऑस्ट्रेलियातील पर्थच्या पश्चिमेकडे असलेला पट्टा हेच विमान कोसळल्याचे ठिकाण असावे असे सांगण्यात आले. गुडनाइट मलेशियन थ्री सेव्हन झीरो असे शब्द बोईंग ७७७ विमानाच्या कॉकपिटमधून क्वालालंपूर येथून बीजिंगला जाताना शेवटी उच्चारण्यात आले होते. मलेशियाच्या मते हे विमान हेतुपुरस्सर वळवण्यात आले व कुशल वैमानिकानेच ते केले असावे किंबहुना एक किंवा अधिक वैमानिक त्यात सामील असावेत. शेवटच्या संवादानंतर विमान मलेशिया ओलांडून हिंदी महासागराकडे गेले. मलेशियाच्या चीनमधील राजदूतांनी सांगितले होते, की ऑल राईट गुड नाईट असे कॉकपिटमधून उच्चारले गेलेले शब्द होते. आता या अपघाताची फोरेन्सिक चौकशी सुरू असून शेवटचे शब्द नेमके काय होते हे निश्चित करण्यात आले आहे. बहुधा हे शब्द सहवैमानिकाचे असावेत असेही आता स्पष्ट झाले आहे. नऊ जहाजे व १० विमाने एमएच ३७० या विमानाच्या सांगाडय़ाचा शोध घेण्यात मंगळवारी सामील होती. मच्छीमारीची सामग्रीवगळता इतर काही वस्तू सापडतील अशी त्यांना आशा आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री डेव्हिड जॉनसन यांनी सांगितले, की विमाने उडवून शोध घेतला, पण हे काम कठीण आहे. दरम्यान मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक हे बुधवारी पर्थला जाऊन शोधकार्याची पाहणी करणार आहेत.