सिंगापूरमधील सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पंतप्रधान ली सिएन लुंग यांच्या पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी पक्षाचे या वेळी पूर्वीपेक्षा बरे आव्हान असूनही जनतेने त्यांनाच विजयी केले आहे. त्यांचा पक्ष स्वातंत्र्यानंतर बाराव्या वेळा सत्तेवर आला आहे. पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीने ८९ सदस्यांच्या संसदेत ८३ जागा पटकावल्या आहेत, तर द वर्कर्स पार्टीने सहा जागांवर विजय मिळवला.

गेल्या निवडणुकीत त्या पक्षाला सात जागा मिळाल्या होत्या. काही छोटे पक्षही निवडणुकीत सहभागी होते. पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीची (पीएपी) सत्ता १९६५ पासून त्या शहर-राष्ट्रांत आहे. त्या पक्षाला ६९.८६ टक्के मते मिळाली असून, २०११च्या तुलनेत त्यांची मते १० टक्के वाढली आहेत. सत्ताधारी पक्षाची लोकप्रियता काही धोरणांमुळे कमी होत चालली असतानाही त्याच पक्षाला विजय मिळाला आहे. त्यामुळे सिंगापूरमध्ये द्विपक्षीय प्रणालीच्या आशा पुन्हा धुळीस मिळाल्या. न्यूज आशिया वाहिनीला ली यांनी सांगितले, की सिंगापूरवासीयांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी आपण आभारी आहेत. ली कुआ यू यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीची लाटही असू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे. दिवंगत पंतप्रधान ली कुआ यू यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. सिंगापूर एका वळणावर असताना आम्ही निवडणुका जाहीर केल्या, त्यात मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रउभारणीसाठी सर्वानी एकजूट दाखवण्याची गरज आहे. पीएपी सत्तेवर येणार हे अपेक्षित होते, पण एवढय़ा मताधिक्याने त्यांचा विजय होईल असे वाटले नव्हते. वर्कर्स पार्टीने पीएपीला काबूत ठेवण्यासाठी निवडणूक लढवली, पण त्यांना फारशा जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे राजकीय विविधता पुन्हा साध्य झालेली नाही.