देशात करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात होण्या अगोदर ८ जानेवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुसरा ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या अगोदर २ जानेवारी रोजी संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तेव्हा सर्वच जिल्ह्यांमध्ये ‘ड्राय रन’ घेण्यात आलेला नव्हता. आता होणारा दुसरा ‘ड्राय रन’ हा देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम २८ व २९ डिसेंबर रोजी चार राज्यांमधील काही ठिकाणी पहिला ‘ड्राय रन’ घेण्यात आला.

पंजाबा, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या ‘ड्राय रन’चे परिणाम समोर आल्यानंतर, सरकारने संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ८ जानेवारी रोजी पुन्हा एकदा संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ पार पडणार आहे.

दुसरीकडे लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे उद्या(गुरुवार) राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर बैठक करणार आहेत. या वेळी ते राज्य सरकारच्या तयारीचा आढावा घेतील. उद्या साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.

Coronavirus – देशभरात आज ‘ड्राय रन’; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश

देशात लसीकरणाच्या कार्यक्रमास पुढील आठवड्यात सुरूवात होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत सांगितले होते की, लसींना मान्यता मिळाल्यानंतर दहा दिवसांच्या आत प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रम घेतला जाऊ शकतो.

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही -आरोग्य मंत्रालय

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी या लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसणार आहे. दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरू करण्यास आम्ही सज्ज आहोत, आता अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा आहे, असं  आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं आहे.