भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे स्पष्टीकरण

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये रक्तद्रव चाचण्या सकारात्मक आलेल्या व्यक्तींमध्ये नंतर करोनाला मारणारे प्रतिपिंड न राहिल्याने आता मार्चमध्ये करोनाची दुसरी लाट आली असावी, असे मत भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेने (सीएसआयआर) व्यक्त केले आहे.

सीएसआयआरने म्हटले आहे की, त्यांच्या ४० प्रयोगशाळांतील १०,४२७ जणांवर रक्तद्रव चाचणी करण्यात आली होती, त्यात काही कंत्राटी कामगारही होते. त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. एकूण १७ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशात या कर्मचारी व कुटुंबीयांच्या रक्तद्रव चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात १९,४२७ जणांपैकी सरासरी रक्तद्रव सकारात्मकता १०.१४ टक्के होती. या सर्वेक्षणातून असे दिसून आले होते की, त्यांच्यात विषाणूला मारणारे प्रतिपिंड होते पण पाच – सहा महिन्यांनी हे लोक पुन्हा विषाणू संसर्गाला सामारे गेले. कारण त्यांच्यात प्रतिपिंड शिल्लक राहिले नाहीत. सप्टेंबर २०२० मध्ये देशात करोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांना संसर्ग झाला होता त्यानंतर देशात ऑक्टोबरच्या सुरुवातीला नवीन रुग्णांची संख्या घटू लागली होती, असे शोधनिबंधाचे लेखक शंतनु सेनगुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते गेल्या पाच सहा महिन्यांच्या काळानंतर  करोनाला निष्क्रिय करतील असे प्रतिपिंड किमान २० टक्के व्यक्तींमध्ये दिसून आले नाहीत. अगदी कठोर मापनांचा आधार घेतला तर प्रतिपिंडांचे प्रमाण आणखी कमी झाले असावे. सप्टेंबर ते मार्च २०२१ या काळाची तुलना केल्यानंतर हे दिसून आले.

या शोधनिबंधातील माहितीनुसार  सप्टेंबर २०२० मध्ये रक्तद्रव चाचण्या सकारात्मक येण्याचा सरासरी दर १०.१४ टक्के होता. कंत्राटी कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक कर्मचारी यांच्यात तो अधिक होता. पण आता नवीन संसर्ग झाला असता  त्यांच्यात हे करोना मारक प्रतिपिंड नाहीत. किंबहुना करोना विरोधात प्रतिकारशक्ती फार काळ टिकत नाही, अगदी जास्त संसर्ग झालेल्या भागातही हाच अनुभव आला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात आता मार्चपासून रुग्णसंख्या वाढत आहे.

२४ शहरांतील माहितीचा आधार

शोधनिबंधात म्हटले आहे की, सध्याचा अभ्यास हा भारतातील २४ शहरांतील माहितीच्या आधारे करण्यात आला. त्यातून भारतात सप्टेंबर २०२० मध्ये ज्यांच्यात क रोना विरोधी प्रतिपिंड होते त्यांच्यात ते राहिलेच नाहीत किंवा कमी राहिले. हा अभ्यास व रक्तद्रव सर्वेक्षण यांची सांगड  घातली असता लाखो लोक पुन्हा संसर्ग होण्याच्या गटातील आहेत. जास्त संपर्क येत असलेल्या  रोजगार किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण यात दुप्पट आहे. जूनमध्ये करण्यात आलेल्या रक्तद्रव सर्वेक्षणाच्या आधारे असे म्हणता येते की, त्यावेळी मुखपट्टी व सामाजिक अंतरामुळे रुग्ण संख्या कमी झाली होती.