जगभरातील इंटरनेट तसेच मोबाइलच्या वापराबाबत अमेरिकेकडून हेरगिरी केली जात असल्याचे वृत्त जाहीर करून संपूर्ण जगात खळबळ उडवून देणारा २९ वर्षीय एडवर्ड स्नोडेन अज्ञातवासात गेला आहे. इंग्लंडच्या द गार्डियन या वृत्तपत्राला दिलेल्या दीर्घ मुलाखतीत अमेरिकेच्या या कृत्याचा भांडाफोड केल्यानंतर स्नोडेन जगभरातील प्रसारमाध्यमांसाठी मोठी बातमी ठरला. ही बातमी फोडल्यानंतर स्नोडेन आपले हवाई येथील घर सोडून हाँगकाँगला आला आहे आणि आता अज्ञातवासात गेला आहे. अमेरिकेच्या एनएसएसाठी काम करणाऱ्या कंपनीशी स्नोडेन संबंधित होता.
स्नोडेनच्या दाव्यानंतर जगभरात खळबळ उडाली असून भारतानेही अमेरिकेच्या हेरगिरीची गंभीर दखल घेतली आहे.
गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत स्नोडेन याने म्हटले आहे की, अमेरिकी सरकार काय करीत आहे हे मला सांगायचे होते. मी काहीही चुकीचे केले नाही, स्वत:ची ओळख लपवून ठेवण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. मात्र प्रसारमाध्यमांना टाळायचे होते एवढेच.
अमेरिकेच्या हेरगिरीचा भांडाफोड केल्यानंतर २० मे रोजी हवाई येथील घर सोडून स्नोडेन २० मे रोजी हाँगकाँगला आला.गार्डियनच्या पत्रकाराने येथे त्याची दीर्घ मुलाखत घेऊन मालिका चालवली. मात्र स्नोडेन याचे हाँगकाँगमधील वास्तव्य तसेच त्याच्या भविष्यातील योजनांबाबत काहीच माहिती दिली नाही.
दरम्यान, स्नोडेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी हाँगकाँगमधील काही पाठीराख्यांनी गेल्या शनिवारी अमेरिकेच्या दूतावासासमोर निदर्शने करून अमेरिकेच्या कृत्याचा निषेध केला तसेच स्नोडेनवर खटला चालवू नये असे आवाहन केले.
स्नोडेन अज्ञातवासात गेल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्याची प्रेयसी लिंडसे मिल्स हिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. डान्सर असणाऱ्या लिंडसेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली नसून तीदेखील आता गायब झाली आहे. मात्र ती स्नोडेनसोबत नसल्याचे बोलले जाते.