इराकमध्ये मूलतत्त्ववादी बगदादच्या दिशेने कूच करत असल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने इराकमध्ये सर्वपक्षीय चर्चा तातडीने घडवून आणली जावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर इराकमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे तेलाच्या किमती महागल्या आहेत. अमेरिकेत अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षा चमूची भेट घेत याप्रकरणी कोणती कारवाई करता येऊ शकेल यावर मंथन केले.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत इराकमध्ये उद्भवलेल्या अराजकसदृश परिस्थितीवर बंद दरवाजांआड तब्बल दोन तास चर्चा झाली. यावेळी उपस्थित असलेल्या १५ सदस्यांनी इराकी जनतेस व इराकी सरकारला दहशतवादविरोधी लढाईत पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच याप्रकरणी नव्याने चर्चा सुरू करावी आणि शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचे प्रयत्न करून पाहावेत, अशी मागणीही सुरक्षा परिषदेतर्फे करण्यात आली.
इराकी पंतप्रधानांनी देशात आणीबाणी जाहीर करण्याच्या दृष्टीने पर्याय चाचपून पाहिले होते, मात्र लोकप्रतिनिधींकडून त्यांना म्हणावे असे पाठबळ मिळू शकले नाही. या पाश्र्वभूमीवर, इराक सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने संयुक्त राष्ट्रांना सहकार्य करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

‘हाती शस्त्रे घ्या’
शिया मुस्लिमांचे सर्वोच्च धर्मगुरू अयातोल्लाह अली अल-सिस्तानी यांनी इराकवासीयांना दहशवाद्यांविरोधात शस्त्रे हाती घेण्याचे आवाहन शुक्रवारी केले. करबाला येथील मशिदीत सामुदायिक प्रार्थनेच्या वेळी एका प्रतिनिधीने सिस्तानी यांच्यावतीने तसे जाहीर केले. देशातील काही भागात हिंसाचाराने कळस गाठला आहे. त्याला खंबीररीत्या तोंड द्यायचे झाल्यास ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत आणि लढण्याची ताकद आहे, त्यांनी रस्त्यावर उतरावे. जो देशासाठी बलिदान करण्यास तयार असेल, तो आमच्यासाठी हुतात्मा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतही हालचालींना वेग
दहशतवाद्यांना इराक तसेच सीरियामध्ये आसरा मिळू नये, यासाठी कोणते उपाय योजता येतील, यावर विचार सुरू असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. इराकला आमची तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत लागेल, असेही ते म्हणाले. त्याच दृष्टीने सर्वाधिक प्रभावी आणि कमीत कमी हानी करणारी मदत इराकला कशी देता येईल, याचे वेळापत्रक आम्ही तयार करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.