बंगळुरू येथे महिलेवर एटीएम केंद्रामध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर देशातील सर्वच एटीएम केंद्रांवरील संरक्षणात वाढ करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने एटीएम केंद्रांना असलेल्या धोक्याचा आढावा घेण्याच्या सूचना सर्व बँकांनी दिल्या आहेत.
सर्वसामान्यपणे सर्व बँकांच्या एटीएम केंद्रांवर कायमस्वरूपी सुरक्षारक्षक तैनात केलेले असतात. तर प्रत्यक्ष बँकेच्या आवारात असलेल्या एटीएम केंद्रांवर केवळ रात्रीच्या वेळीच असे सुरक्षारक्षक तैनात केले जातात. सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या अनेक खासगी संस्था एटीएम केंद्रांच्या सुरक्षिततेबाबत गेले काही महिने सरकार आणि बँकांकडे अद्ययावततेचा आग्रह धरीत होत्या. तसेच आपल्याला बंदुका आणि आवश्यक शस्त्रांचे परवाने तातडीने मिळावेत यासाठी पाठपुरावा करीत होत्या. मात्र, एकीकडे या मागण्यांकडे लक्ष न देताच सरकारने देशभरात एक लाख एटीएम केंद्रे दोन वर्षांत नव्याने उघडण्यात येणार असल्याचे जाहीर केले, अशी टीका सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या अनेक खासगी कंपन्यांकडून केली जात आहे.
ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, देशभरात १ लाख २६ हजार ९५० एटीएम केंद्रे आहेत. त्यांपैकी बँकेच्या आवारात असलेल्या एटीएमची संख्या ६३३८० आहे. त्यात नवी भर पडल्यास ग्राहकांना कशी काय सुरक्षा पुरविणार, असा सवाल एटीएम केंद्रांवरील रोकडीचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.
हल्लेखोराची माहिती देणाऱ्याला इनाम
बंगळुरूतील एटीएम केंद्रात महिला बँक अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी गुरुवारी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. पोलीस सहआयुक्त बी. के. सिंग यांनी ही घोषणा केली.  महिलेवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने आपला भ्रमणध्वनी ज्या इसमास विकला त्याला आंध्र प्रदेशातील हिंदुपूर शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरास ओळखण्यात आले असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.  सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे या व्यक्तीची ओळख पटली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
‘एटीएम’मधील पैसे सुरक्षित
मुंबई : तुम्ही एटीएममध्ये असाल आणि कुणी दरोडेखोराने तुम्हाला हत्याराचा धाक दाखवून पैसे मागितले तर त्यांना सरळ पैसे काढून द्यावे. कारण एटीएम मशीनमध्ये असलेल्या पैशांचा विमा बँकांनी काढलेला असतो. यामुळे अशा प्रसंगांमध्ये तुम्हाला पैसे परत मिळण्याची शक्यता असते. बेंगळुरूमध्ये झालेल्या घटनेसारखा प्रसंग दुर्दैवाने तुमच्यावर कधीही ओढवला, तर जीव धोक्यात न घालता सरळ त्या लुटारूला जेवढे पैसे पाहिजे आहेत तेवढे काढून द्यावेत. ही सर्व घटना एटीएममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यावर त्याबाबत तुम्ही बँकेकडे तक्रार केली तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. याची माहिती बँकांच्या संकेतस्थळांवर देण्यात आलेली असते.