राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संघाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा आहे. यावरुन काँग्रेसमध्ये सध्या बरीच खळबळ सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही रा. स्व. संघाचे निमंत्रण स्विकारू नये, असा सल्ला राहुल गांधींना देण्यात आला असल्याचे सुत्रांकडून कळते.


कथित नक्षलवादी समर्थक असल्याच्या आरोपाखाली नुकतेच देशभरात अटकसत्र झाले. यावरुन बुधवारी राहुल गांधी यांनी संघावर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, रा. स्व. संघ ही देशभरातील एकमेव स्वयंसेवी संस्था आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले झाले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यात आणि वर्तवणूकीत कुठलाही विरोधाभास दिसता कामा नये, यासाठीच त्यांनी संघाच्या कोणत्याही व्यासपीठावर जाऊ नये असा सूर या बैठकीत उमटला आहे.

दरम्यान, रा. स्व. संघ हा काँग्रेसचा वैचारिक विरोधक असल्याने राहुल गांधींनी त्यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा प्रश्नच येत नाही असे बुधवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले होते. तसेच संघाची विचारधारा ही देशासाठी आणि दलितांसाठी विषासारखी असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. निवडणुकांना लक्ष ठेऊन हे निमंत्रण पाठवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

त्याचबरोबर संघाच्या संघटना असलेल्या भाजपाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी कर्नाटकात आम्ही मुख्यमंत्रीपदाचाही त्याग केला होता. त्यामुळेच संघाचे निमंत्रण जरी आले तरी राहुल गांधींनी ते स्विकारू नये, असे पक्षातूनच आता बोलले जात असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.