अज्ञात बंदूकधाऱ्याने मंगळवारी एका फुटीरवादी कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा निषेध करणाऱ्या निदर्शकांनी काश्मिरातील किमान दोन ठिकाणी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) चे, तसेच पाकिस्तानचे झेंडे फडकावले.
चेहरे झाकून घेतलेल्या आणि इस्लामिक स्टेटच्या झेंडय़ाशी साधम्र्य असलेले काळे बॅनर हाती घेतलेल्या युवकांच्या एका गटाने शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर लगेच जामिया मशिदीतून नौहट्टा चौकाकडे कूच केले. काही युवकांनी पाकिस्तानचे झेंडेही फडकावले. त्यानंतर पोलिसांनी निदर्शकांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावले. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
उत्तर काश्मिरातील कूपवाडा येथील काही भागातही शुक्रवारच्या नमाजानंतर पाकिस्तानी झेंडे फडकावण्यात आल्याच्या बातम्या आहेत. सोपोर शहर तसेच बारामुल्ला जिल्ह्य़ातील इतर काही भागांमध्येही हिंसक निदर्शने होऊन निदर्शकांच्या सुरक्षा यंत्रणांशी चकमकी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या चकमकींमध्ये कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. तेहरिक-ए-हुर्रियत संघटनेचा कार्यकर्ता अल्ताफ शेख याची मंगळवारी एका अज्ञात बंदूकधाऱ्याने हत्या केल्याच्या निषेधार्थ सय्यद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वाखालील कट्टरवादी हुर्रियत कॉन्फरन्सने शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शनांचे आवाहन केले होते.