२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांना एकत्र आणून महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाआघाडीत सामील होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. जे पक्ष या महाआघाडीत सामील होत आहेत, त्यांची देशाच्या विकासात कोणतीही भूमिका नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले.

रोहतकमध्ये गुरुवारी अरविंद केजरीवाल यांनी महाआघाडीबाबात आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘आम्ही २०१९ मधील निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत किंवा आघाडीत सामील होणार नाही’, असे केजरीवाल यांनी जाहीर केले. हरयाणामधील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्व जागा लढवेल आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. दिल्लीतील प्रलंबित विकासकामांवरुन त्यांनी मोदी सरकारवर टीकादेखील केली. ‘दिल्ली सरकारच्या प्रत्येक निर्णयात आडकाठी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही दिल्लीत शिक्षण व आरोग्य या दोन क्षेत्रांमध्ये लक्षणीय बदल केले, असा दावाही त्यांनी केला. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिल्लीकडून विकास कसा करावा हे शिकावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

केजरीवाल यांची ही भूमिका विरोधी पक्षांना धक्का देणारी आहे. केजरीवाल यांनी कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. यानंतर राजदचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्या जंतर- मंतर येथील धरणे आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा देत मोदी सरकारविरोधात विरोधकांसोबतच असल्याचे संकेत दिले. पण आता केजरीवाल यांनी महाआघाडीत सामील होणार नाही, असे सांगत सर्वांनाच धक्का दिला. दिल्लीत आम आदमी पक्षाचा सामना भाजपा आणि काँग्रेसशी असून पंजाबमध्ये त्यांना काँग्रेस आणि अकाली व भाजपा युतीचा सामना करायचा आहे. लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या असून काँग्रेसकडून ‘आप’ला अपेक्षित वागणूक दिली जात नाही. यामुळे केजरीवाल काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेस आणि भाजपाला पर्याय आम आदमी पक्षच आहे, हा संदेशही मतदारांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे देखील पक्षनेतृत्वाला वाटते. महाआघाडीत सामील होऊन नवीन गड काबीज करण्याच्या नादात दिल्ली आणि पंजाबची ताकद कमी होऊ नये यासाठीच केजरीवालांनी अशी भूमिका घेतली असावी, अशी चर्चा आहे.